शिकारी मृत्यू प्रकरणी आठ संशयितांची चौकशी?

रत्नागिरी:- शिकारीसाठी गेलेल्या शिकाऱ्याच्या बंदुकीतील गोळी सुटून शिकाऱ्याचाच मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली पारवाडी   येथे सोमवार दि. 25 जानेवारी रोजी  घडली होती. या प्रकरणी नाटे पोलिसांचा कसून तपास सुरु आहे. आजपर्यंत या प्रकरणी चौकशीसाठी 8 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते.

सोमवार 25 जानेवारी रोजी राजापूर तालुक्यातील नवेदर – भिकारवाडी येथील अनिल शंकर भालवलकर (वय 41) आणि संजय विठ्ठल पड्यार (वय 47) हे दोघेजण शिकारीसाठी धाऊलवल्ली पारवाडी येथील जंगलात गेले होते अशी प्राथमिक माहिती उपलबध झाली होती. यावेळी शिकारीसाठी नेलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अनिल शंकर भालवलकर याच्या पोटाच्या भागाकडे लागली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच नाटे पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी लांजा यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली. दरम्यान पोलीसांनीही याची पाळेमुळे खणून काढण्याचा चंग बांधला आहे. दरम्यान या प्रकरणी  नाटे पोलिसांनी आता पर्यंत 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.