रत्नागिरी:- जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सोडत प्रक्रिया सोमवारी (ता. 25) पार पडली. प्रत्येक तालुक्यातील पन्नास टक्के ग्रामपंचायतींवर महिला राजचा प्रभाव राहणार आहे. नुकत्याच झालेल्या 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील विजेत्या सदस्यांचे अपेक्षित आरक्षण न पडल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
सरपंचपदाची आरक्षण सोडत नऊ तालुक्यात प्रत्येक तहसिल कार्यालयांमध्ये झाली. प्रत्येक तालुक्याला आरक्षणनिहाय कोटा निश्चित करुन देण्यात आला होता. त्यानुसार तालुकास्तरावर कोरोनाचे नियम पाळून हे आरक्षण काढण्यात आले. चिपळूण तालुक्यात 130 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर केले. यामध्ये 83 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्याने यापुढील काळात होणार्या 47 ग्रामपंचायतींना सरपंचपद आताच जाहीर झाल्याने त्यांच्यासाठी ते सोयीचे झाले आहे.
शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या सभागृहात सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी सरपंच पदाचे आरक्षण सोडत कशा पद्धतीने निघणार आहे, याची माहिती दिली. या सोडतीसाठी 1995 पासूनच्या सरपंच आरक्षणाचा सदंर्भ घेण्यात आला. त्यानुसार तालुक्यातील 130 ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षण जाहीर झाले. यामध्ये पन्नास टक्के महिलांना संधी दिली गेली. गुहागर तालुक्यात 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत झाली. 50 टक्के प्रमाणे 33 ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला, अनुसूचित जाती व महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण या पध्दतीने आरक्षण निश्चित केले आहे.
रत्नागिरी तालुक्यात 94 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत झाली. त्यात 48 ग्रामपंचायतींवर महिला राज येणार आहे. रत्नागिरीत पालीसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले. मात्र तिथे अनुसूचित जातीमधील एकही महिला उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे पालीतील लोकांमध्ये संभ्रम होता.
दापोली तालुक्यातील 106 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण प्रक्रिया पार पडली. यामध्ये अनुसूचित जाती 1, अनुसूचित जाती स्त्री राखीव 1, अनुसूचित जमाती 3, अनुसूचित जमाती स्त्री राखीव 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग 14, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव 15, सर्वसाधारण 34 महिला सर्वसाधारण 35 अशा 106 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण आहे. राजापूर तालुक्यात 102 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये पन्नास टक्के महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, सरपंचपदाची आरक्षण सोडत झाल्यानंतर सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून ग्रामपंचायत निवडणूक जिंकणार्या अनेकांच्या अपेक्षांना सुरूंग लागला; मात्र अनुकूल आरक्षण पडल्यामुळे पद मिळवण्यासाठी नेत्यांकडे फिल्डींग लावण्यास ते सज्ज झाले आहेत.