उद्या ठरणार गावचा कारभारी; आरक्षण सोडतीकडे दिग्गजांचे लक्ष

इच्छुकांकडून देव पाण्यात

रत्नागिरी:-जिल्ह्यातील 846 पैकी 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या; मात्र सरंपच पदाचे आरक्षण न पडल्यामुळे गावच्या कारभाराचा गाढा हाकणारा कारभारी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदस्य निवडणुकीपूर्वी मीच सरपंच अशी इच्छा बाळगून रिंगणात विजयी झालेल्यांचा निकाल सोमवारी (ता. 25) लागणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसात या ग्रामपंचायतींवरील प्रशासकांची सद्दीही संपणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वी सरपंच पद आरक्षण सोडत तारीख जाहीर झाली होती; मात्र अचानक निवडणुकीनंतर ही प्रक्रिया करण्याचे निश्‍चित झाले. त्यामुळे सरपंचपदाच्या हेतूने रिंगणात उतरणार्‍यांमध्ये सुरवातीपासूनच चलबिचल निर्माण झाली. बहूतांश ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याने प्रत्येकाला संधी देण्यासाठी सव्वा वर्ष सरपंचपद ही शक्कल लढवली जाते. सुरवातीची पहीली संधी मिळवण्यासाठी खटाटोप असतो. यंदा उलट परिस्थिती झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षणच पडलेले नसल्यामुळे निवडणुकीत उतरलेल्यांच्या मनात अजुनही धाकधुक राहीली आहे. आरक्षण सोडत उद्या (ता. 25) होणार आहे. त्यामुळे अनेकांनी आरक्षण इच्छेला अनुरुप व्हावे यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. पुरक आरक्षण पडले तर त्या अनुषंगाने सरपंचपदासाठी फिल्डींग लावण्यास सर्वचजणं मोकळे होणार आहे.