गावागावात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग; काठावरचे सदस्य अज्ञातवासात

रत्नागिरी:- तालुक्यातील ग्रामपंचायत निकालात अनेक प्रस्थापितांना धक्के बसले. काही ठिकाणी गाव पॅनलने बाजी मारली तर काही ठिकाणी राजकीय पक्षांना काठावरचे बहुमत मिळाले. अशा ठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. सदस्य पळवापळवीची शक्यता असल्याने अनेकांनी आपले सदस्य अज्ञातवासात नेऊन ठेवले आहेत. तालुक्यातील मिऱ्या, काळबादेवी, कोतवडे येथे सरपंच निवडीवेळी कांटे की टक्कर पहायला मिळण्याची शक्यता आहे. 
 

तालुक्यातील 41 ग्रामपंचयतींचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. 41 पैकी अनेक ठिकाणी शिवसेना पुरस्कृत पनेलने बाजी मारली. तर मोजक्या ठिकाणी भाजप तर काही ग्रामपंचायतीमध्ये गाव पॅनलने आपली सत्ता आणली. ग्रामपंचायत निकालानंतर आता सर्वांच्या नजरा 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. आरक्षण सोडत आपल्या बाजूने लागल्यास सरपंच पदी विराजमान होण्याची स्वप्न आतापासूनच अनेकांना पडू लागली आहेत. 
 

तालुक्यात गाव पॅनल आणि भाजपने मिळून जवळपास दहा ठिकाणी बहुमत मिळवले आहे. हे बहुमत मिळवले असले तरी अनेक ग्रामपंचायतीमध्ये या दोन्ही पक्षांना अगदी काठावरचे बहुमत मिळाले आहे. अशा ठिकाणी घोडेबाजार केला जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील काळबादेवी, मिऱ्या, कोतवडे, सोमेश्वर आणि अन्य काही ठिकाणी एकमेकांच्या पक्षातील निवडून आलेले उमेदवार फोडण्यासाठी आतापासूनच डाव आखले जात आहेत. सरपंच पदासाठी अमुक आरक्षण पडणार याचा अंदाज बांधून संभावित उमेदवारांनी आपल्या सदस्यांना अज्ञातवासात लपल्याची चर्चा सुरू आहे. 25 जानेवारी रोजी सरपंच पदासाठी आरक्षण प्रक्रिया होणार आहे. यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया होईल. यात दोन आठवड्यांचा कालावधी जाण्याची शक्यता असून तोपर्यंत निवडून आलेले काही सदस्य अज्ञातवासातच राहण्याची शक्यता आहे.