काळबादेवी, मिऱ्या ग्रामपंचायतीत अपक्षांचा भाव वधारला 

त्रिशंकू अवस्था; अपक्षांच्या निर्णयाकडे नजरा

रत्नागिरी:-ग्रामपंचायत निवडणुकीत तू तू मै मै सुरू असतानाच काही ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली असून काळबादेवी व मिऱ्या ग्रामपंचायतीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, यातील काळबादेवी ग्रामपंचायतीत शिवसेना भाजपमध्ये टाय झाल्याने टॉस उडवून निकाल देण्यात आला. या निकालात भाजपच्या महिला उमेदवाराने बाजी मारली आहे.

मी या गटाचा मी त्या गटाचा असे जाहीरपणे सांगून ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क पक्षाविरोधातच अनेकांनी दंड थोपटले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरीचे प्रकार घडले होते. काही ठिकाणी अनेक वर्षांची असलेली खोतकी या निवडणुकीत मतदारांनी मोडीत काढून प्रस्थापितांना धक्का दिला आहे.

असाच प्रकार काळबादेवी व मिऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत पहायला मिळाले आहे. पक्षाच्या अधिकृत पॅनेलविरोधात काही पक्षाच्या नेत्यांनी समर्थकांचे पॅनेल  उभे करून त्यांना बंडखोरी करण्यास लावली होती. मात्र या ठिकाणी देखील बंडखोरांना सपाटून मार खावा लागला आहे. काळबादेवी ग्रामपंचायतीत एकूण ९ जागा होत्या. त्यापैकी ३ जागा शिवसेनेच्या तर ४ ठिकाणी गावपॅनेलने माजी मारली होती. १ जागा भाजपने जिंकली तर दुसऱ्या जागेवर शिवसेना-भाजपमध्ये टाय झाला होता. त्यामुळे हे त्रांगडे निर्माण झाले. शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी टॉस करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार विजयी उमेदवाराची घोषणा केली. शिवसेनेच्या जान्हवी वारेकर व भाजपच्या प्राची साईनाथ मयेकर या दोघीनाही २१९ मते पडली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी टॉस केल्यानंतर प्राची साईनाथ मयेकर यांनी त्यात बाजी मारली.

असाच त्रिशंकूचा प्रकार शहरानजीकच्या मिऱ्या ग्रांमपंचायतीत घडला आहे. एकाच वाडीतील २ उमेदवार अपक्ष निवडून आल्याने प्रस्तापित पक्षांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मिऱ्या ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या ५, भाजपच्या ४ व अपक्ष २ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे या ठिकाणीदेखील त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.ज्या ठिकाणी राजकीय पक्षांना काटावरचं बहुमत मिळालं अशा ठिकाणी आता फोडाफोडीच्या राजकारणाल ऊत येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ग्रामविकास आघाडीचे सदस्यदेखील आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न प्रस्तापित राजकीय पक्षांनी सुरू केला आहे.

दरम्यान, २ ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने मिऱ्या व काळबादेवी ग्रामपंचायत नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून या दोन्ही ठिकाणी आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार आहे.