शिकारीसाठी लावलेल्या फासकीत फसला बिबट्या

माजगाव येथील घटना, वन विभागाकडून बिबट्याची सुटका

रत्नागिरी:- शेतात शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना मजगांव आंबेकोंडवाडी येथे उघडकीस आली. फासकीत अडकलेल्या बिबट्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी फोडलेल्या डरकाळीमुळे शेतात बिबट्या असल्याचे उघडकीस आले आणि त्यानंतर बिबट्याला फासकीतून बाहेर काढण्यासाठी यंत्रणेची धावपळ सुरू झाली.

ग्रामीण भागात पुन्हा एकदा फासकी लावून शिकार करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मजगांव येथील या घटनेमुळे फासकी लावण्याचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.राजरोसपणे शिकार होऊ लागल्याने वन्यजीवांचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सोमवारी असाच एक प्रकार मजगांव आंबेकोंडवाडी येथे उघडकीस आला आहे. वासुदेव दत्तात्रय अभ्यंकर यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी फासकी लावली होती. डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला होता. बिबट्याच्या ओरडण्याने परिसरात खळबळ उडाली होती. अखेरीस याबाबतची माहिती पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांना मिळाली.मजगांव आंबेकोंडवाडी येथे फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती पं.स. सदस्य गजानन पाटील यांनी वन्यविभागाला त्याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळताच परिक्षेत्र वनअधिकारी वनपाल संगमेश्वर, वनपाल पाली आदींनी मजगांवकडे धाव घेतली.बिबट्या फासकीत अडकल्याने जखमी झाला होता. त्यामुळे त्याला फासकीतून बाहेर पडणं जिकरीचे झाले होते. अखेरीस वन्य विभागाने मोठे धाडस दाखवून कटरच्या सहाय्याने फासकी तोडून अडकलेल्या बिबट्याला फासकीतून बाहेर काढले.हा बिबट्या मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे १० वर्षे असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बिबट्याला पिंजऱ्यात घेतल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. या तपासणीनंतर बिबट्या सुस्थितीत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी दीपक खाडे, सहाय्यक वनरक्षक सचिन निलक यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड, वनपाल कांबळे, वनपाल उपरे, वनरक्षक कुुबल, कोर्ले, पताडे, दाभोळे, मिलिंद डाफळे यांनी पार पाडली.