प्रशासन सज्ज; 360 ग्रामपंचायतींची मतमोजणी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक रिंगणात असलेल्या 4 हजार 332 उमेदवारांची लॉटरी आज सोमवारी (ता. 18) फुटणार आहे. 2009 जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.
गावाच्या कारभारात महत्त्व असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी (ता. 15) शांतते पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यात 68.21 टक्के मतदान झाले होते. कोरोना कालावधीतही मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. बहूतांश मुंबईकर गावीच असल्यामुळे मतदानाचा टक्काही वाढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यांचा प्रचारातील सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरलेला होता. सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. 9 फेर्या होणार असून त्यासाठी 12 टेबल लावण्यात येणार आहेत. एकावेळी एका ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण केली जाईल. तो निकाल जाहीर केल्यानंतर दुसर्या ग्रामपंचायतीची मोजणी सुरू होईल. रत्नागिरी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या मतमोजणी 9 फेर्यांमध्ये होणार आहे. त्यानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळी 4 वाजेपर्यंत बहूतांश तालुक्यातील मोजणी पूर्ण होईल. मंडणगड, लांजा, गुहागर या तिन तालुक्यात कमी ग्रामपंचायती असल्यामुळे तिथे लवकर मोजणी होईल. तसेच खेड, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती असल्याने तिथे प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दिवसभर लागण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रापासून 100 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे फटाके लावणे मिरवणुक काढता येणार नाही. कोरोना काळात निवडणूक होत असल्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा भाजप ग्रामपंचायतींमध्ये किती यश मिळवणार याबाबत उत्सुकता आहे. जिल्ह्यातील पन्नास टक्केहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यामुळे यामध्ये यश मिळविण्याची भाजपची सत्तपरिक्षा आहे. त्यामुळे गावागावातून सक्षम उमेदवार उभे करण्याबरोबरच त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपचे पदाधिकारी कसुन प्रयत्न करत होते. मोठे यश मिळणार नसले तरीही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला वाडीवस्तीवर कार्यकर्त्यांची फौज बांधण्यासाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे.