जिल्ह्यात आज कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण 

रत्नागिरी:- कोविड प्रतिबंधासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज शनिवारी (ता. 16) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय, कामथे  उपजिल्हा रुग्णालय, गुहागर ग्रामीण रुग्णालय आणि राजापूर  ग्रामीण रुग्णालय अशा 5 ठिकाणी 500 जणांना लस देण्यात येणार आहे. त्या-त्या आरोग्य संस्थेतील 100 आरोग्य कर्मचारी यांना लस दिली जाईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दापोली, कामथे, गुहागर, राजापूर या चार ठिकाणी शंभरपेक्षा कमी संख्येने कर्मचारी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र असूद, आडरे, आबलोली, धारतळे येथील कर्मचार्‍यांना लस दिली जाईल. त्यात ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा आदी दीर्घ आजार आहेत, त्यांना ही लस सध्या दिली जाणार नाही. सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, पुणे या लस उत्पादक कंपनीने बनविलेल्या कोविशिल्ड या लसीचे 16 हजार 330 डोसेस जिल्हा मुख्यालयाकडे उपलब्ध आहेत. ही लस स्नायूमध्ये दंडावर 0.5 मिली या प्रमाणात दिली जाईल. 28 दिवसांच्या अंतराने 2 डोसेस देण्यात येतील.

लसीकरणासाठी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशा प्रकारे तीन कक्षांची रचना केली असून संपूर्ण लसीकरण प्रक्रिया 5 प्रशिक्षित सदस्यीय लसीकरण चमूद्वारे पार पाडली जाईल. ज्यांची नोंदणी यापूर्वी झाली आहे, त्यांनाच ही लस देण्यात येईल. लसीकरणाबाबतचा एसएमएस लाभार्थ्याच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर केला आहे. एसएमएसची खात्री केल्यानंतर लाभार्थ्यास प्रतिक्षा कक्ष, त्यानंतर लसीकरण कक्षात प्रवेश दिला जाईल. लसीकरण कक्षामध्ये लाभार्थीने नोंदणीच्या वेळी दिलेल्या ओळखपत्राची खात्री करुन कोविन अ‍ॅपमध्ये नोंद केली जाणार आहे.

लसीकरणानंतर निरीक्षण कक्षात अर्धा तासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. लसीकरण पश्चात लाभार्थ्यास काही समस्या जसे खाज, चक्कर, उलटी आदी उद्भवल्यास त्यावर उपचार केले जातील. समस्या न उद्भवल्यास लाभार्थ्यास पुढील डोसची तारीख सांगून कोविड अनुरुप वर्तन कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक असल्याबाबत सांगितले जाईल. घरी गेल्यानंतर त्रास उद्भवल्यास जवळच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व वैद्यकीय अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत.