ग्रामपंचायत मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज; मोठा बंदोबस्त तैनात करणार

रत्नागिरी:- जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका शांततेत व सुव्यवस्थेत पार पडाव्या यासाठी जिल्हा पोलिस दलाने तगडी तयारी केली आहे. गावपतळीवर राजकारणातून वादविवाद होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस निरीक्षक, चार उपविभागीय पोलिस अधिकारी, 80 टक्के कर्मचार्‍यासह कोकण परिक्षेत्रातून मोठा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. एक डीवायएसपीसह 22 अधिकारी आणि 250 कर्मचारी, 400 होमगार्ड मागविण्यात आले आहेत. त्यामुळे गावा-गावाला पोलिस छावणीचे स्वरूप येणार
आहे.

जिल्ह्यात 15 जानेवारीला सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडत आहे. मात्र आज प्रचार संपल्याने प्रचाराच्या तोफा तंडावल्या आहेत. गुप्त प्रचारावर उमेदवार व लोकप्रतिनिधींचा भर असणार आहे. जिल्ह्यात एकूण 489 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. त्यापैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.  उर्वरित 360 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक कर्मचार्‍यांना केंद्रावर पाठविण्याची तयार प्रशासनाने केली आहे. गाव पातळीवरील राजकारण अतिशय वेगळे असते. त्यामुळे किरकोळ कारणावरून वाद होण्याची शक्यता असते. निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताची जोरदार तयारी झाली आहे. यापूर्वी अनेक ग्रामपंचायत भागात पोलिसांनी संचलन करून आपली ताकद दाखविली आहे.  

जिल्ह्यातील या 360 ग्रामपंचायतींच्या बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील 16 पोलिस ठाण्याचे निरीक्षक, उपनिरीक्षक, 4 डीवायएसपी, 15 ते 20 सहायक पोलिस निरीक्षक, 350 ते 400 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. तर पालघरसह अन्य जिल्ह्यातूनही मोठा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यामध्ये एक उपविभागीय पोलिस अधिकारी, 22 अधिकारी, 250 कर्मचारी तर 400 होमागर्ड मागविण्यात आले आहेत. त्यामुळे संवेदनशील केंद्रासह प्रत्येक केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे.