रत्नागिरी:- ग्रामपंचयात निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या आढाव्यात शिवसेनेची स्थिती मजबूत आहे. बिनविरोध झालेल्या 119 ग्रामपंचायतीवरही सेनेचे प्राबल्य आहे. मुले सक्षम, सुदृढ असतील तर त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही. तशी जिल्ह्याची परिस्थिती आहे. आमचे मंत्री सर्व आमदार ही मुलं मजबूत आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असून येथे सेना आणि सेनाच राहिल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली.
हॉटेल विवेक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, जिल्ह्यात शिवसेना 489 ग्रामपंचायती लढत आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आज रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यांतील प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत निवडणुकीचा आढावा घेतला. शिवसेनेची परिस्थिती खरोखर चांगली आहे. त्यानंतर तीन विधानसभा मतदार संघाचा आढावा झाला. बिनविरोध झालेल्या 119 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचेच प्राबल्य आहे. सेनेचा झेंडा ग्रामपंचायतींवर अजून मजबुतीने फडकेल. एखादे मुल सुदृढ, सक्षम असेल तर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. तशी रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती आहे. येथील मंत्री उदय सामंत, राजन साळवी, योगेश कदम ही सर्व आमची मुलं मजबूत आहेत. आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना अभेद राहणार.
शिवसेनेत कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत. विरोधकांना फायदा उठवता येणार नाही, अशी रणनीती आखली पाहिजे, अशा सूचना सर्वांना आज दिल्या आहेत. शिवसेना सक्षम आहे. कोण काय म्हणत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे परब यांनी सांगितले.