ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा थंडावला; गावच्या सत्तेसाठी छुप्या घडामोडींना वेग

रत्नागिरी:- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेल्या जाहीर प्रचाराचा धुरळा बुधवारी सायंकाळी थंडावला. जिल्ह्यात 479 ग्रामपंचयतींपैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 360 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. जाहीर प्रचार थंडावला असला तरी गावची सत्ता आपल्याच हाती असावी यासाठी छुप्या घडामोडींना वेग आला आहे. 

जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या 479 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या. मंडणगड तालुक्यातील 15, दापोली 57, खेड 87, चिपळूण 83, गुहागर 29, संगमेश्‍वर 81, रत्नागिरी 53, लांजा 23, राजापूर 51 अशा मिळून 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. 7 हजार 194 उमेदवारांनी अर्ज केले होते. शेवटच्या दिवशी 1 हजार 48 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. 479 पैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तब्बल 1 हजार 814 उमेदवार बिनविरोध निवडून आले.