मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे 90 टक्के काम मार्च 2022 पर्यंत मार्गी 

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील 91 किमी वगळता सर्व काम मार्च 2022 मध्ये पूर्ण होणार आहे. आरवली ते कांटे व कांटे ते वाकेड हा 91 किमीचा मार्ग डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन तथा राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदार सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भातले पत्रही त्यांनी पत्रकारांना दिले.

प्रभू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रगतीसंदर्भात 23 डिसेंबरला गडकरी यांना पत्र दिले होते. त्यावर गडकरींनी मला पत्र पाठवले. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण जोरात सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 चे चौपदरीकरण एनएचएआय आणि राज्य पीडब्ल्यूडी यांनी केले आहे. एकूण 450 किमी मार्गापैकी सध्या 230 किमीचे काम पूर्ण झाले आहे. साधारण 43 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण होण्यास पुढील वर्षअखेर उजाडणार आहे. त्यानंतरच महामार्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

पनवेल ते झारापपर्यंतच्या महामार्गाचे 230.71 किमी काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. आरवली ते वाकेड या टप्प्यावरील काम पूर्ण होण्यास 2022 चा डिसेंबर महिना उजाडेल. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी या प्रकल्पाचा सतत आढावा घेण्यात येत आहे, अशी ग्वाही गडकरींनी दिली आहे.