देशभरात 10 कोटींची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला जयगडमध्ये बेड्या

रत्नागिरी:- शेकडो बोगस वेबसाईट बनवून पेट्रोल पंप डिलरशिपसह बजाज फायनान्स लोन त्याचबरोबर रिलायन्स टॉवर अशा जाहिराती करून देशभरात १०५३१ नागरिकांची १० कोटी १३ लाख रूपयांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात सायबर सेलला यश आले आहे. यातील ३ आरोपींना जयगड परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे रत्नागिरी कनेक्शन असल्याने याची पाळेमुळे खोदण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

मुंबईत अनेकांना या टोळीने गंडा घातल्याने मुंबई पोलीस या टोळीच्या मागावर होते. मुंबई पोलिसांचे एक पथक पश्‍चिम बंगाल व रत्नागिरी येथे रवाना झाले होते. या टोळीतील ३ आरोपी रत्नागिरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई सायबर सेलचे एक पथक रत्नागिरीत दाखल झाले होते.

टोळीतील तीन संशयित आरोपी हे रत्नागिरी तालुक्यातील जयगड परिसरात आश्रयाला आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या आरोपींचे फोटो जयगड पोलिसांना पाठविण्यात आले होते. या फोटोच्या आधारे जयगड पोलिसांनी विवेक अजयप्रसाद कुमार (वय २४), दीपक मधुसूदन प्रसाद सिंग (वय ४५), सवित दीपक सिंग (वय ३८) यांना वाटद-खंडाळा येथून जेरबंद करण्यात जयगड पोलिसांना यश आले आहे.

या टोळीतील संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली आहे. जयगड-खंडाळा येथे अटक केलेल्या तिघांपैकी एकजण बिहार फायरिंग प्रकरणातील फरार आरोपी असून बिहार पोलीसदेखील त्याच्या मागावर असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. दरम्यान, या अटकेतील सर्वांना मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.