1 हजार 48 उमेदवारी अर्ज मागे; 1 हजार 814 उमेदवार बिनविरोध
रत्नागिरी:- जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १०४८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून ४७९ पैकी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तब्बल १८१४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ३६० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मंडणगड तालुक्यातील १५, दापोली ५७, खेड ८७, चिपळूण ८३, गुहागर २९, संगमेश्वर ८१, रत्नागिरी ५३, लांजा २३, राजापूर ५१ अशा मिळून ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. ७१९४ उमेदवारांनी अर्ज केले होते. शेवटच्या दिवशी १०४८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये मंडणगड ३७, दापोली १५८, खेड १६७, चिपळूण १८८, गुहागर ४७, संगमेश्वर १६१, रत्नागिरी १७०, लांजा ४२, राजापूर ७८ असे मिळून १०४८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मंडणगड तालुक्यात ४९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर २ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. दापोली तालुक्यात १५ ग्रामपंचायती व २५१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. खेडमध्ये २३ ग्रामपंचायती ३३० उमेदवार, चिपळूण २२ ग्रामपंचायती ३४३ उमेदवार, गुहागर १३ ग्रामपंचायती १५४ उमेदवार, संगमेश्वर १९ ग्रामपंचायती २९८ उमेदवार, रत्नागिरी १२ ग्रामपंचायती १८१ उमेदवार, लांजा ४ ग्रामपंचायती ७२ उमेदवार, राजापूर ९ ग्रामपंचायती १३६ उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
मंडणगड तालुक्यात १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर दापोली तालुक्यात ४२, खेड ६४, चिपळूण ६१, गुहागर १६, संगमेश्वर ६२, रत्नागिरी ४१, लांजा १९ तर राजापूर ४२ अशा मिळून ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
१५ जानेवारी रोजी ४०३२ उमेदवार निवडणूक लढवणार असून १८ जानेवारी रोजी या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.
नो मास्क नो व्होटींग
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने निवडणूक काळातदेखील योग्य ती खबरदारी घेतली आहे. सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य विभागाची पथके तैनात केली जाणार आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगदेखील अनिवार्य करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे मास्कची सक्ती करण्यात आली असून विना मास्क येणार्याला मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निवडणुका म्हटल्या की खर्च हा आलाच. प्रशासनाला निवडणुकीकरिता लाखो रूपये खर्च करावे लागतात. यावेळी तर ४७९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया होणार होती. एका ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेसाठी ४० हजार रूपये खर्च येतो. मात्र यावेळी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने शासनाचा ४७ लाख ६० हजार रूपयांचा खर्च वाचला आहे.
बिनविरोधसाठी बक्षिस नाही
यापूर्वी बिनविरोध होणार्या ग्रामपंचायतींना शासनाकडून पारितोषिक दिले जात होते. यावेळी बिनविरोध होणार्या ग्रामपंचायतींनाा २५ लाख रूपये मिळणार अशा वावड्या उठविण्यात आल्या होत्या. मात्र असे कोणतेही पारितोषिक शासनाने जाहीर केलेले नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.