रत्नागिरीतील आगरनरळ ग्रामपंचायत बिनविरोध; महाविकास आघाडीचा झेंडा

रत्नागिरी:-तालुक्यातील 95 टक्के ग्रामपंचायती या ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले आहे. त्याचे फलीत म्हणजेच आगरनरळ ग्रामपंचायत बिनविरोध झाली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सौरभ लवंदे, वैदेही समीर लवंदे, प्रकाश कांबळे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते कुमार शेट्ये, सुदेश मयेकर, बशीरभाई मुर्तुझा, मिलिंद कीर, बबलू कोतवडेकर, शहराध्यक्ष निलेश भोसले, प्रदेश सचिव बंटी वणजू यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी जोरदार मोहीम सुरु आहे. या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तरुणांची फळी तळागाळात उतरली आहे. या टीमने जिथे जिथे ग्रामपंचायत निवडणुक लागली आहे, तिथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेच्या त्या-त्या गावातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेट दिली. बहूतांश ग्रामपंचायतीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार उभे करण्यावर भर दिला आहे. आगरनरळ ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे तिन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. ही ग्रामपंचायत बिनविरोध यावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाकडून शिवसेनेला सहकार्य करण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. गेल्या पंचवीस वर्षाचा सत्ता संघर्ष मोडीत काढण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला आहे.