ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा उद्यापासून उडणार 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपुष्टात; रंगत वाढली

रत्नागिरी:- जिल्ह्यातील जवळपास पाचशे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीने रंगत वाढली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे राज्य असले तरी ग्रामीण भागात मात्र सेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सर्वच पक्ष स्वबळावर नशीब आजमावत आहेत. आज सोमवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून मंगळवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. मंगळवार पासून खऱ्या अर्थाने गावागावातील राजकारणाला वेग येणार आहे. 

जिल्ह्यात मुदत संपलेल्या जवळपास 480 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. पक्षाच्या वरिष्ठस्तरावर जरी महाविकास आघाडीकडून निवडणुका लढवण्याची घोषणा झाली असली तरी स्थानिक पातळीवर याची अमलबजावणी झालेली नाही. ज्या पक्षाची ज्या भागात ताकद अधिक त्या पक्षाने आपले स्वतंत्र पॅनल उभे केले. काही पक्षांना उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करू लागली. 

उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत उमेदवारांची प्रचंड धावपळ उडाली. निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच जबाबदारी उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात मुख्य लढाई रंगण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेने जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपला संधीच ठेवलेली नाही. पंचायत समितीत भाजपचे दोनच सदस्य आहेत. शिवसेनेकडून ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. बहूतांश ठिकाणी निवडणुक बिनविरोध करण्यावरच सेनेचा प्रयत्न सुरु होता; परंतु भाजपने बहूतांश ठिकाणी उमेदवार देत सेनेपुढे आव्हान निर्माण केले आहे. भाजपमधील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा परिणाम या निवडणुक निकालांवर दिसेल अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काही जांगावर उमेदवार उभे केले आहेत. पण तालुक्यात शिवसेना विरुध्द भाजप अशीच लढत होणार आहे. इतर तालुक्यात देखील असेच चित्र आहे. अनेक ठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभे करून शिवसेने समोर आव्हान निर्माण केले आहे.

 सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपुष्टात आली. सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. मंगळवार पासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. प्रचाराचे नियोजन सर्वच पक्षांनी केले आहे. पुढील दहा दिवस गावागावात निवडणुकीचीच चर्चा रंगणार असून राजकीय वातावरण तापणार आहे.