‘मॉक ड्रील’मध्ये जयगड पोलीस पास; पाच अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी: गणपतीपुळे तीर्थक्षेत्र परिसरात अतिरेकी घुसून ते लपले असल्याच्या संदेशाने परिसरात एकच गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. पोलिस यंत्रणा सतर्क झाली. तत्काळ शीघ्र कृतिदलासह मोठा पोलिस फौजफाटा गोळा झाला. लपलेल्या अतिरेक्‍यांना शोधण्यासाठी रेकी करण्यात आली. त्यानंतर सुरू झाले, कोंबिंग ऑपरेशन. काही तास सुरू असलेल्या या कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून लपलेल्या पाच अतिरेक्‍यांच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. हे चित्र स्थानिक ग्रामस्थांची झोप उडविणारे होते; मात्र हे पोलिसांनी केलेले ‘मॉक ड्रील’ होते, हे सांगितल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 

पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे मंदिर येथे हे मॉक ड्रील झाले. गणपतीपुळे मंदिरात पाच अतिरेकी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संपूर्ण पोलिस यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागली. तत्काळ घटनास्थळी शीघ्र कृतिदल, जयगड पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक अस्मिता पाटील, मधाळे, गिरीगोसावी, प्रशांत लोहळकर, चव्हाण, गणपतीपुळे येथील जीवरक्षक विक्रम राजवाडकर, अनिकेत राजवाडकर, रोहन माने, मयूरेश देवरूखकर हे या रंगीत तालीममध्ये सहभागी झाले.


दरम्यान, मंदिर परिसरात लपलेल्या अतिरेक्‍यांचा माग काढण्यासाठी पोलिस यंत्रणेने या परिसराची रेकी केली. या भागामध्ये लपता येईल, अशी ठिकाणे निश्‍चित केली. त्यानंतर काही तुकड्यामध्ये पोलिस विभागले गेले आणि त्या भागात जोरदार कोंबिंग ऑपरेशन केले. पोलिसांनी तो परिसर पिंजून काढला. या कोंबिंग ऑपरेशमध्ये पाच अतिरेक्‍यांच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले.


सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने अनेक ठिकाणाहून देशी-विदेशी पर्यटकांची रत्नागिरीत मोठी गर्दी होते. गणपतीपुळे हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी पोलिस बळाच्या सतर्कतेसाठी रंगीत तालीम घेण्यात आली.