शहरातील स्मशानभूमीत आता गॅसवरील शवदाहिनीवर अंत्यसंस्कार 

रत्नागिरीः– हजारो वर्षापासून मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर केला जातो. रत्नागिरी शहरातील दोन्ही स्मशानभुमीत याच पध्दतीचा वापर केला जात होता. आता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. चर्मालयातील स्मशानभुमीत गॅसवरील शवदाहिनी बसविण्यात आली आहे. सुमारे ३५ लाख खर्च करुन पालिकेने शवदाहिनी उभारली आहे.अत्यंत कमी वेळात या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार असून सुरुवातीला कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी या दाहिनीचा वापर केला जाणार आहे.

मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी वर्षानुवर्षे लाकडांचा वापर केला जातो. या पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी बराच कालावधी लागतो. तर मोठ्या प्रमाणात लाकडे लागतात. त्यातून प्रदुषणहि मोठ्या प्रमाणात होते. महानगरांमध्ये अंत्यसंस्कारासाठी इलेक्ट्रीक, गॅस वरील शवदाहिनीचा वापर केला जातो. तिच पध्दत आता रत्नागिरी पालिका अवलंबत आहे. सुरुवातीला चर्मालय येथील स्मशानभुमीत गॅसवरील शवदाहिनी बसविण्यात आली आहे.
लाकडांद्वारे अंत्यसंस्कार करणे आता महागडे झाले आहे. लाकडांचे दर वाढल्याने पालिकेने अंत्यसंस्कारासाठी दीड ते दोन हजार दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत गॅस शवदाहिनीद्वारे एक हजार रुपयात अंत्यसंस्कार करणे शक्य होणार आहे. गॅस शववाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केल्यानंतर पुर्वीप्रमाणे विधी करता येणार आहेत.

नागरिकांमार्फत पारंपारिक पध्दतीला प्रधान्य दिले जाते. त्यामुळे गॅस शवदाहिनीचा वापर किती प्रमाणात केला जाईल यावर अन्य स्मशानभुमीत शवदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. चर्मालय येथे सुरुवातीला कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी या शवदाहिनीचा वापर केला जाणार आहे. पालिकेने तब्बल ३५ लाख रु.खर्च करुन शवदाहिनी उभारली असून कमी कालावधीत मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.