अर्ज दाखल करण्यात अडचणी; धाकधूक वाढली
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार्या उमेदवारांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. कधी सर्व्हर डाऊन तर कधी वेबसाईट संथ गतिने होत असल्याने इच्छुक उमदेवारांमध्ये चलबिचल सुरु आहे.
जिल्ह्यात 479 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची गडबड अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वत्र अर्ज भरण्यासाठीची लगबग सुरु असून विविध प्रकारची कागदपत्रे गोळा करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यामध्ये मंगळवारी (ता. 29) सर्व्हर डाऊनची भर पडली.आज बुधवारी (ता. 30) दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे उमेदवार चांगलीच फरपट होताना दिसत आहे. काल सकाळी 8 वाजल्यापासून अनेक उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे सायबर कॅफेंसह ऑनलाईन भरण्यासाठीच्या केंद्रावर गर्दी करुन होते. दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत ही गर्दी सुरुच होती. तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांना तासनतास सायबर कॅफे, महा ईसेवा केंद्रात ताटकळत रहावे लागले. काहींनी शक्कल लढवत सोमवारी रात्रीच अर्ज भरले. वेबसाईटवरील कागदपत्रे अपलोड होताना नेट संथ झाल्यामुळे गोंधळात भर पडत होती. यामुळे इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या.
ऑफलाईन अर्ज स्विकारणार उमेदवारी अर्ज दाखल करताना 28 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळपासून इंटरनेट गती कमी, सर्व्हर डाऊन आदी तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. याबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार वंचित राहू नयेत आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने पारंपारिक पध्दतीने (ऑफलाईन) अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आज 30 डिसेंबरला सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जातील. असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.