रोहन बनेंनी पहिल्या वर्षातच पाडली नेतृत्वाची छाप

अधिकारी-पदाधिकारी सुसंवाद वाढला; सदस्य देखील समाधानी

रत्नागिरी:- प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधत रोहन बने यांनी प्रतिकुल परिस्थितीत जिल्हा परिषदेचा कारभार हाकताना स्वतःची छाप पाडली. अनेक वर्षे सुरु असलेला प्रशासन विरुध्द लोकप्रतिनिधी वाद संपुष्टात आणतानाच प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी विषय तडीस नेण्यावर सर्वाधिक भर दिला. प्रत्येक सदस्याला व्यक्त होण्याची संधी देत त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी मार्ग काढला. त्याचा प्रत्यय काही दिवसांपुर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आला.

जानेवारी 2019 मध्ये रोहन बने यांच्यावर शिवसेनेकडून अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पदभार स्विकारला तेव्हा जिल्हा परिषदेमध्ये प्रशासन विरुध्द लोकप्रतिनिधी असे चित्र होते. गतिमान प्रशासन करण्यासाठी पावले उचलत रोहन बने यांनी सुरवातीलाच समन्वयाचे धोरण स्विकारले. कर्मचार्‍यांचे अनेक वर्षांचे रखडलेले प्रश्‍न सोडवण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या. त्यातील काही प्रश्‍न सुटत असतानाच जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश केला. तिथून परिस्थिती बिघडली. सहा महिने संपूर्ण कारभार अनियंत्रीत होता. काही कटू निर्णय घेत रोहन बने यांनी कोरोना काळातही कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देत कारभार चालवला. उपाध्यक्षांसह सहकारी सभापतींचे विचार समजून घेतानाच सदस्यांची सातत्याने संवाद साधण्यावर भर दिला. विषय समित्यांसह स्थायी, सर्वसाधारण सभा रद्द करण्याची वेळ आली. निधी मिळविण्यात अडचणी होत्या. मात्र रोहन बने यांनी या कठीण कालावधीही कर्णधाराची भुमिका व्यवस्थितरित्या सांभाळली. विकासनिधीसाठी मंत्रालय गाठत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या मदतीने ग्रामविकासमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, शिक्षण मंत्री यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे रखडलेल्या कामांना विकासनिधी मिळणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा घडवून आणत सदस्यांना बोलण्याची संधी दिली. प्रत्येक सदस्याने आपापल्या गटातील समस्या मांडून त्याची उत्तरे प्रशासनाकडून कशी मिळतील आणि तो कसा सुटेल यावर बने यांचा भर दिसत होता. त्यामधून महावितरणची रखडलेली कृषी पंप योजना, गहाळ धनादेश, नवोदय विद्यालय प्रवेश यासह जिल्हा परिषदेशी निगडीत अन्य विषय मार्गी लावले. जिल्हा परिषद कारभारावर अंकुश ठेवण्याची महत्त्वाची भुमिका त्यांनी योग्य पध्दतीने पार पडल्याचे दिसत आहे. कोरोना कालावधीमध्ये आरोग्यसह विविध कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत होते. त्यांचा उत्साह वाढविण्यासह त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अध्यक्ष बने स्वतः फिल्डवर उतरले होते. जुनमध्ये झालेल्या निसर्ग वादळात नुकसानग्रस्त मंडणगड, दापोली, खेड तालुक्यांचे दौरे केले.