गुहागर:- अल्पवयीन विवाहित मुलगी ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यावर गुहागर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात तिच्या दोन कथित प्रियकरांबरोबरच अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे.
गुहागर तालुक्यातील मासू गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे येथील तरुणाबरोबर १५ दिवसांपूर्वी झाला होता. विवाहानंतर १५ दिवसांनी सदर अल्पवयीन तरुणीच्या पोटात दुखू लागले. रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत ही तरुणी ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे रत्नागिरी पोलिस ठाण्यात बालकांवरील लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पॉस्को) अज्ञाताविरोधता गुन्हा दाखल केला होता.
याचा तपास करताना सदर मुलीसोबत २ मुलांचे प्रेमसंबध असल्याचे उघड झाले. या पैकी एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. या तरुणाचे २०१८ पासून या मुलीवर प्रेम होते. ही दोघं एकमेकांना भेटत होती. असे चौकशीत समोर आले. तसेच ही मुलगी अल्पवयीन असताना तिच्यासोबत लग्न करणाऱ्या मार्गताम्हाणे येथील तरुणावर देखील गुन्हा दाखल केला.