कोकण पर्यटकांनी हाऊसफुल्ल; समुद्रकिनारे गजबजले

रत्नागिरी:- नाताळ सणानंतर आता नववर्षाच्या स्वागतसाठी कोकणात दाखल झालेल्या हजारो पर्यटकांनी कोकण हाऊसफुल्ल झाले आहे. पर्यटकांचा सर्वाधिक ओढा रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात असून दोन्ही जिह्यातील हॉटेल्ससह एमटीडीसीची रिसॉर्टदेखील फुल्ल झाली आहेत. यावर्षी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून कोकणातील पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वाधिक पसंती समुद्र किनाऱ्याना दिल्याने रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील प्रत्येक समुद्रकिनारा पर्यटकांच्या हजेरीने गजबजुन गेले आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या सेलिब्रेशनसाठी तरूणाईदेखील उत्सुक आहे. यासाठी खास प्लॅनदेखील तयार करण्यात आले आहेत. यावर्षी न्यू इयर सेलिब्रेशनची धम्माल पहाटे पाचपर्यंत एन्जॉय करता येणार असल्याने प्रत्येकाने आपआपल्यापरीने पार्टीचे बेत आखले आहेत. आधी नाताळ आणि आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात दाखल झालेल्या लाखो पर्यटकांनी कोकणाला जत्रेचे स्वरूप आले आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यातील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. या पर्यटकांसाठी शासनाने काही विशेष सुविधा पुरवल्या नसल्या तरी मात्र येथील काही नागरिकांनी निवास, न्याहारी, हॉटेल्स तसेच ग्रामीण पर्यटनावर आधारित अशा सुविधा, वॉटर स्पोर्ट्स अशा सर्व सोयी उपलब्ध केल्यामुळे पर्यटक आता कोकणात स्थिरावू लागले आहेत. पर्यटकांचा ओढा हा जास्त समुद्रकिनार्यांकडे असून तेथील आनंद लुटतानाच पर्यटक जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांचीही सैर करू लागले आहेत. परिणामी आतापर्यंत गाडीतून कोकणचे दर्शन घेत गोव्याकडे धाव घेणारे पर्यटक आता येथे विसाऊ लागले असल्याने खºया अर्थाने पर्यटन व्यवसाय आता रुजू लागल्याचे दिसत आहे. असे असले तरी शासनाने या पर्यटन व्यवसायाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक हॉटेल व्यावसायीकांनी नववर्ष स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांनादेखील आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.