कोरोनाचा फटका; एक हजार कोटींची मासळी पडून

रत्नागिरी : चीनविरोधातील वातावरण आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका कोकणातील मत्स्य प्रक्रिया निर्यातीला बसला आहे. किमान एक कोटींचा माल पडून राहिल्याने प्रक्रिया उद्योग संकटात आहेत. पर्यटन थांबल्याने थायलंड, मलेशियातील बांगड्यांच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने दर घसरले आहेत. चीनला पर्यायी आफ्रिकन देशातही मालाची मागणी कमीच आहे.

मासळी व्यवसायातून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होत असून, निर्यातीतून कोट्यवधीचे परकीय चलन मिळते. परदेशात फ्रोजन मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रक्रिया करून क्रोकरी आणि रिबन फिश (बळा) निर्यात केला जातो. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने मासळी निर्यातीला लागलेले ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. निर्यातीचे नियम, अटींचा फटका बसत आहे.

फ्रोजन मासळीची सर्वाधिक मागणी चीनमध्ये आहे. कोकणातून महिन्याला सरासरी ५०० कोटींची प्रक्रिया केलेल्या मासळीची निर्यात होते. कोरोना प्रादुर्भावामुळे मालाचीही कसून तपासणी होते. संशयास्पद आढळले, तर तो माल रद्द केला जातो. गेल्या तीन ते चार महिन्यांत अनेक निर्यातदारांना याचा फटका बसला. सध्या ८० टक्‍के माल पडून आहे. कोरोनाबरोबरच जागतिक स्तरावर चीनविरोधी ट्रेंड असल्याने निर्यात धोरण अडचणीत आले आहे. 

माल पाठविण्यापूर्वी चीनमधील कंपन्यांकडून ३० टक्‍केच पेमेंट मिळते. उर्वरित ७० टक्‍के पेमेंट मालाची कोरोना तपासणी झाल्यानंतर होते. चीनऐवजी आफ्रिका देशात निर्यात सुरू केली गेली; परंतु तिकडे तेवढी मागणी नसल्याने चीनमधील वातावरण निवळण्याची प्रतीक्षा उद्योजकांना आहे.

बांगडा माशांवरही कोरोनाचे संकट मलेशिया, थायलंडला निर्यात होणाऱ्या बांगडा माशांवरही कोरोनाचे संकट आहे. पर्यटन थांबल्याने या दोन्ही देशांत जाणारा भारतातील पर्यटक घटला आहे. या दोन्ही देशांमधील बांगड्याची मागणी कमी झाल्याने त्याचा सर्वाधिक भार देशी मार्केटवर पडत आहे. ३२ किलोच्या डिशला चार ते सहा हजारऐवजी एक हजार ६०० ते एक हजार ९०० रुपये मिळत आहेत. बांगड्याचा दर कमी झाल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.