पावसमध्ये आरंभी निवडणूक नको रे बाबा

उमेदवार शोधण्याची वेळ ;शिवसेनेचे  वर्चस्व

रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे गावपातळीवरील राजकारण तापायला सुरवात झाली आहे. निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अनेकजणं गुडघ्याला बाशिंग बांधुन असतात. मात्र तालुक्यातील पावस ग्रामपंचायतीचे राजकीय परिस्थिती अजब आहे.अनेकांनी निवडणुक नको रे बाबा, असे सूर आळवले आहेत.

शिवसेनेकडे एकहाती सत्ता आहे. स्थानिक पातळीवर कामं न होणे, एखादा वाद मिटवायचा तर समोरच्या दोन्ही पार्ट्या आपल्याच त्यामुळे वाईटपणा कुणी घ्यायचा आणि तोही कोणाबरोबर. हे सर्व लक्षात घेत अनेकांनी निवडणुक नको अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सेनेसह भाजप, राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्याची वेळ आल्याची चर्चा आहे.पावस ग्रामपंचायतीचे राजकारण काही वर्षापूर्वी फार वेगळे होते. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादीचे प्रस्थ कमी होत गेले. शिवसेनेने येथे मजबूत पक्षबांधणी केली. त्यामुळे पावस ग्रामपंचायतीवर एकहाती शिवसेनेची सत्ता आहे. भाजप किंवा राष्ट्रवादीला वाढण्यामध्ये सेनेने येथे काही ठेवलेले नाही. उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे पावस भागात अनेक विकास कामे करून पक्ष बांधण्यात आला आहे. त्यामुळे नुकत्याच होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा वरचष्मा राहणार हे जवळजवळ निश्‍चित आहे. उमेदवार उभे करण्यासाठी पावस परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पावस ग्रामपंचायतीवरील भगवा कायम फडकत रहावा यासाठी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांसह विभागप्रमुख, शाखाप्रमुखांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.शिवसेनेचे पारडे जड असल्यामुळे भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला पाय पसरण्यास संधी नसल्याने लढण्यास फारसे कोणी इच्छुक नाहीत.