रत्नागिरी:- जिल्ह्यात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 479 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला बुधवार पासून सुरुवात होणार. कोणाचे तिकीट फायनल आणि कोणाचा पत्ता कट, कुणाला लागणार सरपंच पदाची लॉटरी याचीच चर्चा सध्या गावातील नाक्यानाक्यावर सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी बुधवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बैठकांचा जोर वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या मुदतीत सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी असणार आहे.
31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून प्राप्त नामनिर्देशन पात्रांची छाननी केली जाणार आहे. 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर त्याच दिवशी दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह नेमून देणे आणि निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड 15, दापोली 57, खेड 87, चिपळूण 83, गुहागर 29, संगमेश्वर 81, रत्नागिरी 53, लांजा 23 तर राजापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.