जिल्ह्यात प्राथमिक शाळांचे वर्ग पुन्हा सुरू

रत्नागिरी:- प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नसला तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सकारात्मकतेमधून सुरु झाले आहे. ग्रामीण भागातील सुमारे एक हजाराहून अधिक शाळांतील शिकवणी सुरु झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावातील पारावर, कुणाच्या घरात किंवा सभागृहात सोशल डिस्टन्सिंग राखून होणारी शिकवणी वर्गात सुरु करण्यात येत आहे.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर 9 ते 12 च्या शाळांमधील प्रत्यक्ष कामकाज सुरु करण्यात आले. जिल्ह्यातील 358 शाळांत 26 हजार विद्यार्थी प्रत्यक्ष शिकवणी घेत आहेत. ग्रामीण भागातील शाळांची संख्या सर्वाधिक असून शहरी भागात याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्याच पावलावर पाऊल टाकण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळाही सज्ज झालेल्या आहेत. गेले पंधरा दिवस शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत पालकांकडून संमती पत्र घेण्याचे काम सुरु होते. सोमवारपासून (ता. 21) अनेक शाळांमध्ये शिकवणीचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद राजापूर, लांजा तालुक्यात असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. शाळांमधील प्रत्यक्ष शिकवणीसाठी शिक्षण विभागाने अधिकृत कोणतेही आदेश दिलेले नव्हते; मात्र तालुकास्तरावरुन शिकवणी सुरु करण्यासाठी पावले उचण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 2600 हून अधिक शाळा आहेत. त्यातील 40 टक्के शाळा सुरु झालेल्या आहेत.
कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर जुलै महिन्यापर्यंत शैक्षणिक सत्राविषयी संभ्रम होता; मात्र ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले. पुढे ग्रामीण भागात जाऊन काही शिक्षक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवू लागले. प्रत्येक विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे अशक्य असल्यामुळे काही शिक्षक गावातील पारावर, सभागृहात किंवा एैस पैस जागा असलेल्या घरात शिकवणी करत होते. जिल्हा परिषदेच्या सुमारे सातशेहून अधिक शाळांची पटसंख्या ही 10 पेक्षा कमी आहे. तिथे मुलांना सोशल डिस्टन्सिंगने बसविणे शक्य आहे. तसेच मास्क, हात धुणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. या शाळांचे वेळापत्रक पूर्ण दिवस ठेवलेले नाही.