रत्नागिरीतील हायटेक बसस्थानकाचे काम पुन्हा सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बहूचर्चित मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. हे काम सुुरु करण्यासाठी भाजपसह अनेक लोकप्रतिनिधींनी एसटी अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. माणसे नसल्यामुळे हे काम रखडले होते.

तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हायटेक बसस्थानकाचा प्रकल्प हाती घेत जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, लांजा या बसस्थानकांना मंजुरी दिली होती. त्यानंतर रत्नागिरीतील बसस्थानकाच्या कामाला सुरवात झाली. 23 जानेवारी 2018 ला ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला. सुमारे दहा कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प जानेवारी 2021 ला पूर्ण करण्यात येणार आहे. कामाची मुदत संपायला दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असताना केवळ 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही चार महिन्यापूर्वी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिपक पटवर्धन यांनी काही दिवसांपुर्वी एसटीच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन याविषयावर चर्चा केली. त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी याबाबत ठेकेदाराशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले. तसेच लवकरच काम सुरु करण्यात येईल असेही आश्‍वासन दिले होते. त्यानंतर आठ दिवसात यावर कार्यवाही झाली आहे.

सध्या ग्रामीण भागातील फेर्‍या रहाटाघर येथून सोडण्यात येतात. बसस्थानकासमोर रस्त्यावर असलेला थांबा वाहतूकीला अडथळा होत असून प्रवाशांच्या जिवीताला धोकादायक ठरला आहे. लाकडाऊन काळात वाहतूक बंद असल्याने फारसा परिणाम झाला नव्हता. अनलॉकनंतर पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी ठेकेदाराला वारंवार स्मरणपत्रेही पाठविली आहेत. कामगार नसल्याचे कारण देत ठेकेदाराने दिले होते. एसटी अधिकार्‍यांनी याचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर गेले दोन दिवस हे काम सुरु झाले आहे. याला एसटीच्या अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे.
दोन महिन्यांनी कामाची मुदत संपणार आहे. तरीहि ठेकेदाराने कामाला मुदतवाढ मागितलेली नसल्याची माहिती पुढे येत आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर जावा अशी मागणी केली जात आहे.