रत्नागिरी:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगांव येथील मत्स्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी श्रुतिका सावंत हिने रत्नागिरीची मान उंचावली आहे. युनायटेड नेशन्सने स्थापित केलेली अन्न व कृषी संघटना (एफडीओ) या जागतिकस्तरावर काम करणार्या संस्थेत तिची आशिया आणि पॅसिफिकमधील कृषी सहकारी संस्थांच्या विकासासाठी नेटवर्क समन्वयक म्हणून नेमणूक झाली आहे. ही नेमणूक होणारी जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थीनी आहे.
श्रुतिका सावंत हिने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील सॅक्रेट हार्ट कान्व्हेंट स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर शिरगांव मत्स्य महाविद्यालयात डिप्लोमा इंजिनिअर, फिशरीज ऑफ सायन्स या डिग्री परीक्षेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिची अॅक्वाकल्चर मास्टरच्या शिक्षणासाठी वर्ल्ड रॅकिंग कॉलेज थायलंडमध्ये निवड झाली होती. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी थायलंड येथे निवड झालेल्या श्रुतिकाला त्या महाविद्यालयाकडून 60 टक्के शिष्यवृत्ती दिली होती. तिने एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, बँकाक, थायलंड येथे अॅक्वाकल्चर आणि अॅक्वाटिक रिसोर्स डेव्हलपमेंट मधील मास्टर्स ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला ऑगस्ट 2019 पासून थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, अॅक्वाकल्चर आणि अॅक्वाटिक रिसोर्स मॅनेजमेन्ट मधील रिसर्च असोसिएट म्हणून नियुक्त केले गेले होते. तिने विविध संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला होता. संशोधनाबरोबरच तिने प्रशिक्षण कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदांच्या मालिका समन्वित केल्या आहेत.
श्रुतिका आता एनइडीएसीच्या अध्यक्ष सुंदिपकुमार नायक, डॉ. के. आर. सलिन यांच्या देखरेखीखाली काम करणार आहेत. तसेच अक्वॉकल्चर आणि अक्वॉटिक रिसोर्सेस मॅनेजमेंट, स्कूल आफ एन्व्हायर्नमेन्ट येथे त्यांचे संशोधन सहकारी पदावर कार्यरत राहणार आहे. श्रुतिका सावंत हिचे वडील श्रीधर सावंत हे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत हेड मेकॅनिक पदावर तर आई सौ. गीता श्रीधर सावंत या आगाशे प्रथमिक विद्यामंदिरमध्ये शिक्षिका आहेत. श्रुतिका हिला प्रा. आशिष मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले होते.