ग्रामपंचायत आचारसंहितेचा विकासकामांना फटका

 जि. प. प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे धाव 

रत्नागिरी:- पन्नास टक्केपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिल्ह्यात असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्याला लागू आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील विकास कामांवर होणार आहे. मंजूर झालेल्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्याची परवानगी मिळावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून निवडणुक आयोगाकडे परवानगीसाठी पत्र पाठवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 846 पैकी 485 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्याची आचारसंहिताही लागू झाली आहे. निवडणुक आयोगाच्या पत्रानुसार पन्नास टक्केपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक प्रक्रिया होणार असल्याने आचारसंहिता जिल्ह्याला लागू होत आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्याच्या विकास कामांवर होत आहे. जिल्हा नियोजनसह विविध योजनांमधून करावयाच्या कामांची निविदा प्रक्रिया थांबली आहे. आधीच कोरोनामुळे सर्वच प्रक्रिया ठप्प झाल्या होत्या. याबाबत काही दिवसांपुर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही चर्चा झाली होती. कोरोनाचे कारण देत ही प्रक्रिया राबविली गेली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. सध्या निवडणुकीमुळे त्यात भर पडली आहे. आचारसंहिता संपेपर्यंत जानेवारी महिना संपणार आहे. मार्च अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी अवघे दोनच महिने मिळतील. निवडणुक संपेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यास आचारसंहिता संपल्यानंतर ती कामे सुरु करता येतील. अन्यथा आचारसंहितेनंतर निविदा केल्यास पुढे काम पूर्ण करणे शक्य नाहीत. भविष्यातील गोंधळ टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने निविदा प्रक्रियेसाठी परवानगी मिळावी अशी मागणी निवडणुक आयोगाकडे केली आहे. ते पत्र जिल्हाधिकार्‍यांमार्फत आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.