रत्नागिरी:- उत्कृष्ट कारभार, दूरदृष्टी, उच्च विचारसरणी, जबाबदारीने काम, शैली, निर्णयक्षमता, गांभीर्य आणि कार्यकुशलतेची क्षमता या निकषाच्या आधारे दिल्लीतील फेम इंडिया या हिंदी मासिकाने खासदारांचा सर्व्हे केला. यामध्ये एकूण 543 खासदारांपैकी 25 खासदार या निकषात बसले. या पंचवीस खासदारांच्या यादीत खासदार विनायक राऊत यांनी सलग दुसर्या वर्षी स्थान मिळावित कोकणाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
फेम इंडिया हे देशातील पहिले सकारात्मक आणि रेटिंग-आधारित हिंदी मासिक आहे. नऊ वर्षांपूर्वी ते सुरू झाले. यातील प्रत्येक अंकात सर्वेक्षण एजन्सीच्या सहकार्याने विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे रेटिंग दिले गेले आहे. फेम इंडिया मासिक नियतकालिक प्रसिद्ध एजन्सी एशिया पोस्ट, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार, नोकरशहा, प्रभावी लोक, आयएएस आणि आयपीएस अधिकारी, मीडिया मालक, दिग्गज पत्रकार, आमदार, स्टार्टअप्स, युवा, समाज यासारख्या सर्वेक्षण एजन्सीसमवेत वेळोवेळी सहकार्य करते. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या नामांकित व्यक्ती आणि संघटनांच्या कार्याचे मूल्यांकन करते.
या मासिकाच्यावतीने एशिया पोस्टच्या मदतीने लोकसभेतील 543 खासदारांचा सर्व्हे करण्यात आला. यात एकूण 543 खासदारांचे सर्व्हेक्षण केले. 17 व्या लोकसभेतील निवडक 25 खासदारांची त्या निकषाआधारे निवड केली. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी 25 खासदारांमध्ये स्थान मिळविले आहे. गेल्यावर्षी देखील त्यांनी असेच स्थान पटकावले होते.
या निकषांचाही होतो विचार… निवडीसाठी निकष लावताना लोकप्रियता, सार्वजनिक जीवनातील व्यस्तता, वैयक्तिक प्रतिमा, सभागृहातील उपस्थिती आणि चर्चेतील सहभाग, लोकहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, लोकशाही मजबूत करण्यासाठी आणलेली खासगी विधेयके इत्यादींचा विचार केला जातो. त्यानंतर या 25 खासदारांची निवड करण्यात येते.