साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका

छोट्या व्यवसायिकांची नगराध्यक्षांकडे कैफियत 

रत्नागिरी:-  रत्नागिरी नगर परिषदेने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवून फेरीवाले, खोके, टपरी व्यवसायिकांना हद्दपार केले आहे. या हद्दापारीने गळीतगात्र झालेल्या या व्यावसायिकांनी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे. कोरोनानंतर आता तर कुठे व्यवसायांना प्रारंभ केलाय…त्यामुळे साहेब पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका अशी विनंती केली आहे.  

नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊन शहरातील रस्त्यांवरील सर्व अतिकमणे हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आली. त्या हटाव मोहिमेत शहरातील रस्त्यांवर, रहदारीस अडथळा ठरणाऱया सर्व टपऱया, खोके, हातगाड्या हटवण्याची धडक कारवाई झाली. या कारवाईने हे व्यवसाय करणारे सारे हवालदिल बनले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च 2020 पासून सुमारे 8 ते 9 महिने व्यवसाय बंद होते. या कालावधीत हे व्यवसायिक अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते.  

कोणतीही सरकारी वा इतरही मदत मिळाली नसल्याची कैफियत या व्यवसायिकांनी मांडली आहे. त्याबाबत कोणाकडे तकारही केली नाही. अशावेळी आताच कुठे सुमारे 15 दिवसांपूर्वी व्यवसाय सुरू केलेले होते. तर नगर परिषदेच्या अतिकमण विभागाने हटविण्याची कारवाई केली. त्यामुळे अक्षरश कंबरडे मोडून टाकले आहे. अगोदरच लाॅकडाऊनकाळात हलाखीत जगणे जगत असताना आता नव्याने सुरू झालेल्या या व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक उभारी मिळेल ही आशा होती. पण ती देखील या कारवाईने पुरती धुळीस मिळाल्याचे सांगितले. 

याबाबत सोमवारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांची या व्यवसायिकांनी भेट घेतली. सुनील शिवलकर, तुलशीदास कोठारकर, शुभम कीर, राहुल रसाळ, राजू पाथरे, प्रविण भाटकर, संतोष देवडींग, सुभाष श्रीनाथ आदींचा यावेळी समावेश होता. न.प.हॉकर्स झोन तयार करून भाडेतत्वावर जागा देणार असल्याचे बोलते, पण तोपर्यंत आम्ही व्यवसायिकांनी करायचे काय? असा सवाल करण्यात आला. आम्हाला अवाढव्य मोठे स्टॉल्स उभारण्यावर आपण अवश्य कारवाई करावी. पण आम्हा छोट्या व्यवसायिकांवर कोसळलेली उपासमारीची तलवार तातडीने दूर करा. गांभीर्याने यात न्याय मिळवून द्यावा अशी विनंती या व्यवसायिकांनी केली आहे.