जैतापूरला हवा सोलर एनर्जी प्रकल्प

रत्नागिरी:- जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर 5 हजार मेगावॅटचा सोलर एनर्जी प्रकल्प आणावा, अशी मागणी रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली. तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिले. शिवसेनेच्या या भूमिकेवरून जनमानसात काय प्रतिक्रिया उमटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी माडबन, मिठगवाणे, करेल, निवेली आणि वरीलवाडी या पंचक्रोशीतील जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक संघर्ष समिती स्थापन झाल्या. परंतु मोबदला मिळू लागल्याने अनेक खातेदारांचा विरोध मावळल्याचे तेव्हा दिसून आले. येथील एकूण खातेदार 2 हजार 336 आहेत. त्यापैकी 1 हजार 787 खातेदारांना जमिनीचा मोबदला देण्यात आला. एकूण 14 कोटी 77 लाख एवढा मोबदला वाटप करायचा आहे. त्यापैकी 13 कोटी 18 लाखाचे वाटप झाले आहे. 549 खातेदारांना 1 कोटी 59 लाख रुपये वाटप करायचे बाकी आहेत; मात्र या प्रकल्पाला तीव्र विरोध झाला होता. त्यानंतर प्रकल्पाविरोधात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामध्ये एका आंदोलकाला बंदुकीची गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर आंदोलकांनी पोलिस चौकी जाळून एका अधिकार्‍यावर प्राणघातक हल्ला केला. अशा प्रकारे आंदोलन चिघळत गेले. विरोधामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम जैसे थे आहे. 

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन सात ते आठ वर्षांपूर्वी संपादित केली आहे; मात्र अजून ती विनावापर पडून आहे. अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याची शक्यताही आता अजिबात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 175 जिव्हा सोलर एनर्जी निर्माण करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार मी आपल्याला विनंती करतो की, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर 5 हजार मेगावॉट सोलर एनर्जी प्रकल्प उभारण्यात यावा. कोकण व महाराष्ट्राच्यादृष्टीने खूप फायद्याचे ठरेल. संपादित जमिनीचाही सदुपयोग होईल. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाच्या जागेवर सोलर प्रकल्प उभारण्याच्यादृष्टीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.