16 लाख कोव्हिड वॅक्सिन स्टोअरेजची क्षमता

ना.उदय सामंत; दिवसाला 10 हजार जणांना लस, चाचण्या 2 हजारावर

रत्नागिरी:- जिल्ह्याला डिसेंबर अखेर प्राप्त होणार्‍या 16 लाख कोरोना वॅक्सिनचे स्टोअरेज (साठवणुक) करण्याची क्षमता आपल्या आरोग्य विभागाकडे आहे. त्याअनुषंगाने आज आढवा बैठक घेण्यात आली. दिवसाला 10 हजार लोकांना लस देण्याची तयारी केली आहे. आजपासून त्यासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच उद्यापासून कोरोना चाचण्यांचे प्रमाणही दोनशे, तिनशेवरून दीड ते दोन हजार केले जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, कोरोनाची लस आपल्याला डिसेंबर अखेर मिळण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची काय तयारी आहे, याचा आढावा घेतला. दोन्ही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. तरी मिळणारी लस कशी वितरित करायची याबाबत माहिती घेतली. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या सुमारे 15 हजार कर्मचार्‍यांना लस दिली जाणार आहे. सिंधुदुर्गात ही संख्या 10 हजार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात 16 लाख वॅक्सिन स्टोअरेज करण्याची क्षमता आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 लाख. सर्व जिल्हा रुग्णालय, ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी ती उपलब्ध असेल. दिवसाला सुमारे 10 हजार लोकांना लस देण्याची आरोग्य विभागाची तयारी आहे. मात्र ती कोणा-कोणाला द्याची याचे मार्गदर्शन आलेले नाही. आता फक्त लस येण्याची आम्ही वाट बघतोय.  

जिल्ह्यात आतापर्यंत अडीचशे ते तीनशे पर्यंत कोरोना चाचण्या होत होत्या. मात्र त्याची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. उद्यापासून दीड ते दोन हजार चाचण्या करण्यात येणार आहेत. 60 टक्के अ‍ॅन्टिजेन तर 40 टक्के आरटीपीसीआरच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.  मुख्यमंत्र्यांच्या महाआवास अभियानाअंतर्गत शंभर दिवसांमध्ये सुमारे 3 हजार 318 घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने यंत्रणा कामाला लागली आहे.