डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाची लस दाखल होणार; 11 हजार जणांना पहिल्या टप्प्यात लसीकरण

रत्नागिरी:- कोरोनाची लस डिसेंबर अखेर पर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होईल. शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेशी निगडित 11 हजार जणांना ही लस देण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यात शासकीय, खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविकांचा समावेश केला गेला आलसल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आरोग्य यंत्रणांची बैठक सोमवारी पार पडली. तीन टप्प्यामध्ये ही लस दिली जाणार आहे. दुसरा व तिसर्‍या टप्प्याची माहिती अद्यापही शासनाने मागविलेली नाही. पहिल्या टप्प्यात कोरोना काळात आरोग्य यंत्रणा व या यंत्रणेबरोबर काम करणार्‍या सर्वांनाच ही लस दिली जाणार आहे. यामध्ये जिल्हारुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सुमारे 80 शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. शासकीय व खासगी हॉस्पीटलमधील डॉक्टर व सर्व कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 134  खासगी रुग्णालये येथील डॉक्टर व कर्मचारी अशा आरोग्य यंत्रणेत कार्यरत असणार्‍या अकरा हजारजणांना ही लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे.

शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर यासाठी तयारी केली जात आहे. सर्व कर्मचार्‍यांच्या नोंदी घेतल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले. सन 2020च्या शेवटी ही लस उपलब्ध होणार असल्याने नवीन वर्षात एक चांगली सुरुवात होईल असा विश्‍वास मिश्रा यांनी व्यक्‍त केला.