एमटीडीसी राबवणार  ‘वर्क फ्रॉम नेचर’ संकल्पना 

रत्नागिरी:- कोरोनामुळे आयटीसह काही मोठ्या कंपन्यांमधील बहुतांशी कर्मचारी वर्क फ्रॉम होमला कंटाळले आहेत. अशा कर्मचार्‍यांना निसर्गाच्या सानिध्यात काम करण्याची सुविधा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एमटीडीसीमार्फत ‘वर्क फ्रॉम नेचर’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांना लग्न सोहळे, प्री वेडिंग फोटो शूट, रिसेप्शन फोटोशूट करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रत्नागिरीमधील गणपतीपुळे, हरिहरेश्वर या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आयटी कंपन्यांसह अनेक उद्योग-व्यावसायिकांनी कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होमवर भर दिला आहे. परंतु काही कर्मचारी वर्क फ्रॉम होमला कंटाळले आहेत. वर्क फ्रॉम होम करणार्‍या अनेक कर्मचार्‍यांना मानसिक तणाव येत आहे. यासाठी एमटीडीसीने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी घरीच राहून जे कामकाज करीत आहेत तेच कार्यालयीन कामकाज निसर्गाच्या सानिध्यात बसून केल्यास कार्यालयीन कामकाजासोबत निसर्गाचाही सुखद अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचार्‍यांकडून लॉकडाऊनपासून परिसर, खोल्या, उपाहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासांसाठी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना पुढील दोन वर्ष करण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज स्प्रे, ऑक्सीमीटर अशी खास व्यवस्था केली आहे. कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी तसेच त्यांना मास्क, फेस शील्ड, हॅण्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर दिले आहेत. कर्मचार्‍यांना सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाबाबत खबरदारीचे प्रशिक्षण दिल्याची माहिती एमटीडीसीने दिली.

कोकणातील रायगडमधील हरिहरेश्वर, रत्नागिरीतील गणपतीपुळे, वेळणेश्‍वर, सिंधुुदुर्गातील कुणकेश्‍वर, तारकर्ली देवबाग या ठिकाणी ही वर्क फ्रॉम नेचर ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. याठिकाणी एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. असा प्रस्ताव एमटीडीसीच्या येथील कार्यालयाकडून प्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ही संकल्पना राबविली जाणार आहे.