जिल्ह्यात साडेतीन वर्षात 616 एड्स बाधित 

लॉकडाऊनच्या सात महिन्यात 59 पॉझिटिव्ह

रत्नागिरीः– एचआयव्ही निर्मुलनासाठी राज्यासह जिल्ह्यात अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असले तरीहि एचआयव्ही बाधित रुग्ण अजुनहि आढळत आहेत. गेल्या साडेतीन वर्षात ६१६ रुग्ण आढळले असून लॉकडाऊनच्या कालावधीत गेल्या सात महिन्यात ५९ रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एचआयव्ही निर्मुनलाचे आव्हान आरोग्य विभागासमोर कायम आहे.परंतु एचआयव्ही बाधित बालकांची संख्या रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. 

सन २००० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एचआयव्ही विभागाची स्थापना करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसह प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात येते. गेल्या साडेतीन वर्षात १ लाख ६७ हजार ६४२ सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६१६ रुग्ण एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळले आहेत. सन २०१७-१८ मध्ये ५४ हजार ४५४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २३२ जण तर चार गरोदर महिला पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. सन २०१८-१९ मध्ये ४६ हजार १९९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६० रुग्ण तर सहा गरोदर महिला पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. तर सन २०१९-२०२० मध्ये ५६ हजार १२४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६५ जण तर पाच गरोदर महिला पॉझिटीव्ह आढळल्या आहेत.  तर चालू वर्षी ऑक्टोबर अखेर १३ हजार ८६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५९ नवे रुग्ण आढळले तर चार गरोदर महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे.

एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार करून मृत्यू दर रोखण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. गरोदर मातेकडून नवजात बालकांना एयआयव्हीचे संक्रमण रोखण्यात आरोग्य विभागाला पूर्णतः यश आले आहे. एचआयव्ही पॉझिटीव्ह महिलांच्या ३२ बालकांची अठरा महिन्यानंतर तपासणी करण्यात आली. सर्व बालके निगेटीव्ह आढळली आहेत. प्रसुतीपूर्व योग्य उपचार केल्यामुळे सर्व बालकांचे एचआयव्हीपासून संरक्षण झाले आहे.एचआयव्ही रोगाबाबत प्रभावीपणे जनजागृती सुरु असली तरीहि रुग्ण संख्या रोखण्यात आरोग्य विभागाला यश आलेले नाही. दरवर्षी एचआयव्ही बाधित रुग्ण दीडशेहून  अधिक आढळत आहेत. त्यामुळे एचआयव्हीची लागण होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहे .
ज्या बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. अशा बालकांची जबाबदारी इतर नातेवाईकांनी घेतली असून औषध, उपचाराचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी गुरुप्रसाद, जागृती फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू आहे.