शहरातील फुटपाथ, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास 

रनपची अतिक्रमण हटाव मोहीम; लवकरच सुधारित धोरण

रत्नागिरी:- पालिकेने शहरातमध्ये अतिक्रमणाविरोधात जोरदार मोहीम आखुन मुख्य रस्त्याच्या फुटपाथवरील टपर्‍या, खोके, फळ, भाजी विक्रेत्यांना हटविले. यामुळे सर्व फूटपाथ रिकामे झाले. मोहिमेचे सर्व थरातून कौतुक होत आहे. मात्र यात हातावर पोट असलेले गरीब भरडले आहेत. पालिकेने त्यांचाही विचार सुरू केला आहे. महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी मार्यादित हातगाडी, टपर्‍यांना परवानगी देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पालिकेने सर्व्हे सुरू केला आहे.

शहरातील आठवडा बाजार, मंगळवार बाजार, मच्छीमार्केट, मिरकरवाडा आदी महत्त्वाच्या ठिकाणी मर्यादित टपर्‍या किंवा वडापावच्या गाड्या टाकण्याची परवानगी पालिका देणार आहे. त्याचा सर्व्हे सुरू झाला आहे.    

वर्षानुवर्षे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने शहरात मुख्य रस्त्यावर टपर्‍या, खोक्यांचे पेव आले. भूते नाका ते साळवी स्टॉपपर्यंतच्या फुटपाथ टपर्‍यांनी व्यापुन गेला. हे अतिक्रमण वाढतच गेले. त्यामुळे ज्येष्ठांपासून अनेक नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार पालिकेने सभागृहात सर्वानुमते ठराव घेऊन फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. तीन दिवस ही मोहीम सुरू आहे. सुमारे साठ ते सत्तर जणांवर कारवाई करण्यात आली. काहींनी आपल्या वजनाचा वापर करून भाड्याने गाडा किंवा खोकी दिली होती. मात्र अनेक गरीब आणि गरजू देखील यात होते. कारवाईत ते भरडले गेले असल्याने पालिकेने त्यांचा विचार करण्यास सुरवात केली आहे.एवढेच नाही, तर वेगळ्या ढाच्याची खोकी तयार करून ती भाडेतत्वावर देण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र हे फक्त विचाराधीन आहे. त्यासाठी सभागृहाची परवानगी घेऊन पुढील निर्णय होणार आहे. आज मुख्य बाजारपेठेत कारवाई करण्यात आली. अनेक दुकानदारांविरोधात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रामआळी, गोखलेनाका आदी भागात दुकानाबाहेरील वस्तू आत घेण्यास सांगितले.