चार वर्षांत साडेचार लाख शेतकऱ्यांकडून जमिनीची मृद तपासणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह स्फुरदचे प्रमाण कमी असल्यामुळे शेती करताना खतांची मात्रा योग्य पद्धतीने देणे शेतकर्‍यांसाठी गरजेचे आहे. रासायनिक खतांचा भरमसाठ वापर झाला तर ती जमीन नापिक होते. त्यासाठी जमिनीची मृद तपासणी अत्यावश्यक आहे. मृद सर्व्हेक्षण कार्यालयाकडून गेल्या चार वर्षात 4 लाख 48 हजार 358 आरोग्य पत्रिका शेतकर्‍यांना वितरित केल्या आहेत.

रासायनिक खतांचा वाढता वापर हा जमिनीचा पोत घसरण्यासाठी कारणीभूत ठरतो. हे टाळण्यासाठी कृषी विभागाकडून मृद तपासणी कार्यक्रमांच्या हाती घेतला जातो. जमिनीचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच भाजीपाला, फळबाग लागवडीतून उत्पादन वाढवणे शक्य होते. 2015-16 पासून जमिनीचे आरोग्य तपासून मृद आरोग्य पत्रिका वितरित करण्यास सुरवात केली. जमिनीत कोणते घटक कमी आहेत, तिथे खतांची मात्रा कशी द्यावी, खतांचे वेळापत्रक असे असावे याचे सविस्तर मार्गदर्शन या आरोग्य पत्रिकेद्वारे शेतकर्‍यांना केले आहे. त्याची अंमलबजावणी केल्यास खरीप, रब्बीसह फळबाग लागवडीतून अधिकाधिक उत्पादन घेणे शक्य होते. रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीत नत्र, स्फुरदचे प्रमाण अत्यंत कमी असून पालांशचे प्रमाण मध्यम आहे. शेतकरी एकच पीक घेत असल्यामुळे ती जमिन नापिक होण्याची भीती असते. त्यासाठी वर्षातून दोन ते तीन वेगवेगळी पिके घेतली पाहिजेत, असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो.