जिल्ह्याच्या भूजल पातळीत समाधानकारक वाढ

रत्नागिरी:- लांबलेल्या मोसमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत 0.37 टक्केनी वाढली आहे. परिणामी यंदा तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार नाही असा अंदाज भूजल विभागाकडून व्यक्त केला जात आहे. सप्टेंबर अखेरीस तपासलेल्या पाणी पातळीत जिल्ह्यात सरासरी 2.97 मीटर पातळी नोंदली गेली.

चक्रीवादळानंतरही जिल्ह्यात मोसमी पाऊस यंदा एक दिवस उशिराने दाखल झाला. ऑक्टोबर महिन्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मोसमी पाऊस उशिरापर्यंत कोकणात बरसत होता. नद्या, नाल्यांसह विहिरींची पाणी पातळी वाढलेलीच आहे. जिल्ह्यात विशिष्ट भाग सोडले तर पाणी टंचाईची झळ अन्य जिल्ह्यांप्रमाणे जाणवत नाही; मात्र मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. अति तापमान आणि पाण्याचे साठे सुखले तरच या परिस्थितीला सामोरे जावे लागते. दोन वर्षांपूर्वी मे महिन्यात अनेकांना पाणी पाणी करत फिरावे लागले होते.

भूजल विभागाकडून सप्टेंबर महिन्यानंतर केलेल्या जिल्ह्यातील 63 विहिरींचे पाणी पातळी तपासणी आली. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार सप्टेंबर अखेरीस पातळी वाढली आहे; परंतु गेल्या पाच वर्षांच्या सरासरीनुसार लांजा आणि मंडणगड तालुक्यात 0.01 ने पातळी खाली असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम तालुक्यातील पाणी टंचाईवर होणार नाही असे भूजल विभागाने सांगितले. जिल्ह्यात पहिला टँकर खेड, त्यापाठोपाठ लांजा तालुक्याचा क्रमांक लागतो. सध्याच्या स्थितीनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाणी साठा पुरु शकतो. डोंगराळ भाग किंवा कातळावरील वाड्या, गावांमध्ये टँकरचा पर्याय दरवर्षीप्रमाणेच अवलंबावा लागणार आहे.