बहुमताच्या बळावर जागा खरेदीचा ठराव मंजूर

रनप सभा; भाजपसह राष्ट्रवादीचे विरोधात मतदान 

रत्नागिरी:- आलिमवाडी येथील बहुचर्चीत जागा खरेदीवरुन गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. नगर परिषदेतील बहुमताच्या जोरावर शिवसेनेने ठराव मंजूर केला. ठरावाच्या बाजूनं 21 तर विरोधात 7 मते पडली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात मतदान केले.
 

रनपची सर्वसाधारण सभा आलिमवाडी येथील जागा खरेदीवरून चांगलीच गाजली. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखालील सभेत विषय पत्रिकेनुसार चर्चेला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीचे विषय झाल्यानंतर विषय क्रमांक १३० मध्ये आलिमवाडी येथे पाणी साठवण टाकीसाठी  जागा खरेदी करताना त्रिसदस्यीय समितीने सुचविलेल्या दराला मंजूरी देण्याचा विषय चर्चेला आला. विषयाला सुरुवात होताच. भाजपा गटनेते समिर तिवरेकर यांनी पालिकेच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. पाणी साठवण टाकीसाठी सरकारी जागा उपलब्ध होवू शकते. असे असताना १ कोटी २७ लाख खर्च करुन खाजगी जागा वाटाघाटीने घेण्याची गरज काय? असा प्रश्न सभागृहात विचारला.त्यावर नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी, नळपाणी योजनेचे काम मार्चपर्यंत पुर्ण करा असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार काम सुरु आहे. पाणी साठवण टाकीमुळे काम थांबू नये, तसेच नागरिकांना लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी पालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत. आलिमवाडी येथील जागा पाणी साठवण टाकीसाठी आवश्यक आहे. तेथून नैसर्गिक उताराने नागरिकांना चांगल्या प्रकारे पाणी मिळू शकेल. यासाठी या जागेचे मुल्यंकन करण्याचा प्रस्ताव पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. जिल्हा प्रशासनाने समितीद्वारे सुमारे १ कोटी २७ लाख मुल्यंकन केले आहे.त्यानुसार विषय पत्रिकेवर विषय ठेवण्यात आला. दर ठरविण्याचा कोणताही अधिकार पालिकेला नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.