ना. सामंतांमुळेच शासनाच्या ठेवी जिल्हा बँकेत राहिल्या

डॉ. चोरगेंकडून ना. सामंत यांचे कौतुकोद्गार

रत्नागिरी:- जिल्हा सहकारी बँकेतील ठेवी काढण्याचे आदेश मंत्रीमंडळस्तरावरुन बदलून आणण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. त्यामुळेच शासनाच्या ठेवी जिल्हा बँकेेतच राहील्या. यामध्ये जिल्हा परिषदेने ठराव करुन बँकेला पाठबळ दिले. असा ठराव करणारी राज्यातील पहिलीच बँक होती, असे सांगत आरडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी कौतुकोद्गार काढले.

आरडीसीसी बँकेच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना डॉ. चोरगे म्हणाले की, शासनाच्या ठेवी आरडीसीसीमधून काढून घेण्याचे आदेश आले होते. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांना विषय समजावून सांगितला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे साकडे घातले. या चार-पाच मंत्र्यांकडे विषय गेल्यानंतर मुख्यमंत्री यांनी आरडीसीसी बँकेतील ठेवी काढून घेऊ नये असा निर्णय घेतला. याचे श्रेय सामंत यांनाही जाते. याहून विशेष अभिनंदन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे करायला हवे. ठेवी जिल्हा बँकेतच राहतील असा ठराव केला आणि तो शासनाला पाठवला. हा निर्णय घेणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी जिल्हा बँक जेवढे करते, तेवढे कोणीच करत नाही. एनपीए वाढली की लगेचच नोटीस येते. मात्र राष्ट्रीयकृत बँकांचा कितीही एनपीए वाढला तरी त्यांना प्रश्‍न येत नाही. शासन तो भरुन काढते. या परिस्थितीत बँक चालवण्याचे आव्हान आमच्यापुढे आहे. कोरोना काळात बँकेची वसूली थांबलेली होती. एप्रिल महिन्यात एनपीए वाढला होता. 47 कोटी रुपयांची वसूली शिल्लक होती. अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आणि 24 कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले.

जिल्हा बँकेने राबविलेला हा उपक्रम नाविन्यपूर्ण आहे. 2007 साली डॉ. चोरगे अध्यक्ष झाल्यानंतर बँकेचे कामकाज चांगल्या पध्दतीने सुरु आहे. ग्रामीण भागात सगळीकडे बँक पोचली आहे. जिल्हा परिषदेच्या बहूतांश ठेवी याच बँकेत आहेत. काही दिवसांपुर्वी एक प्रस्ताव आला होता; मात्र बँक आणि जिल्हा परिषदेचे संबंध प्रेमाचे आहेत. ते भविष्यातही कायम राहतील, असा विश्‍वास अध्यक्ष रोहन बने यांनी दिला.

आज महाराष्ट्राच्या सहकारी बँकामध्ये अग्रणी असलेल्या रत्नागिरीतील शहरी आणि ग्रामीण भागात मोठया प्रमाणात ग्राहक असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाबार्ड एफ.आय.एफ. अंतर्गत अर्थसहाय्यीत मोबाईल ATM व्हॅन चा उदघाटन सोहळा मंत्री महोदय उदय सामंत यांच्या शुभहस्ते आणि रोहन बने अध्यक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.         

या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री महोदय म्हणाले की, ग्रामीण भागात जिथे बँका नाहीत तिथे जनतेला बँकिंगच्या सुविधा देण्यासाठी सुरू केलेला मोबाईल ATM व्हॅन हा उपक्रम महाराष्ट्रातील एक नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद असा उपक्रम आहे ग्राहकाला बँकेत येण्या ऐवजी आता बँक आपल्या दारी ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे व्यापारी, सर्वसामान्य जनतेला निश्चितच उपयुक्त आहे.मी बँकेच्या अभिनव उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील सुरू करून जनतेला सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो.         

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे होते,कार्यक्रमाला व्यासपीठावर रोहन बने, अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा परिषद, बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, श्रीमती अजानिस जिल्हा विकास अधीक्षक नाबार्ड, सुनिल गुरव कार्यकारी संचालक, डॉ.अशोक गार्डी जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था यांची उपस्थिती होती. तसेच राजाभाऊ लिमये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, बँकेचे सर्व संचालक, कर्मचारी, पत्रकार बंधू आणि बँकेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.