जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यासाठी डिसेंबर पंधरवड्याची डेडलाईन

रत्नागिरी:- पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून भविष्यात निर्माण होणार्‍या पाणी टंचाईचे आराखडे तयार करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मंडणगड, खेड, दापोली तालुक्यांच्या बैठका आमदार योगेश कदम यांनी घेतल्या आहेत. तालुक्यांचे आराखडे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मागविण्यात आले आहेत.

यंदा उशिरापर्यंत पाऊस होता. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पातळी स्थिर असून टंचाई उशिरा सुरु होईल असा अंदाज आहे. गतवर्षी 165 वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. टँकर आणि टंचाईग्रस्त गावातील नळपाणी योजना दुरुस्तीवर सुमारे 7 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. जिल्हा परिषद प्रशासनाकडून गवतर्षी 15 कोटीचा टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजूरीसाठी पाठविला होता. तो दोनवेळा दुरुस्तीसाठी पाठविण्यात आला. तो 8 कोटी रुपयांपर्यंत तयार केला गेला. कोरोनामुळे अनेक कामे सुरु करण्यासाठी विलंब झाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर मात करत अनेक गावातील पाणी योजनेची कामे पूर्ण करण्यात आली. यंदाही गतवर्षीप्रमाणे नळपाणी योजना दुरुस्तीची कामे टंचाई आराखड्यामधून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्याचे आराखडे वेळेत येणे आवश्यक आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्याचा आराखडा तयार करुन तो जिल्हा प्रशासनाकडे सादर करावयाचा आहे. त्यासाठी आतापासूनच पाणी पुरवठा विभाग कामाला लागला आहे. गटविकास अधिकार्‍यांना पत्रे पाठवून आराखडे तयार करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. यामध्ये खेड, दापोली, मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. तिन्ही तालुक्यांच्या आढावा बैठका झाल्या असून लवकरच तेथील आराखडे मिळतील. उर्वरित तालुक्यांच्या बैठका अजून झालेल्या नाहीत. सर्वाधिक टंचाई खेड तालुक्यात जाणवते. पहिला टँकरही तिथेच धावतो. हे लक्षात घेऊनच आमदार कदम यांनी त्वरीत पावले उचलली आहेत.