थंडी गायब उष्म्याचा जोर, बागायतदार चिंतातुर

रत्नागिरी:- दिवाळीत गुलाबी थंडीने हजेरी लावल्यानंतर आंबा बागायतदारांचे चेहरे खुलले होते. अवघ्या दोनच दिवसात वातावरण बदलले आणि पुन्हा उष्मा वाढला. पारा 36 अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. थंडी नसेल तर मोहोर येण्यास उशिर होणार आहे. 2009 ला झालेल्या फयान वादळानंतर सातत्याने वातावरणात अशाप्रकारे बदल होत असून त्याचा परिणाम आंबा हंगामावर होत आहे.

हापूस हे संवेदनशील पिक बनले आहे. किमान, कमाल तापमानातील बदल आंबा पिकाला मारक ठरत आहेत. यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भिती व्यक्त केली जात होती. ती आता खरी ठरु लागली आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत परतीचा पाऊस सुरुच होता. नोव्हेंबरच्या सुरवातीला थंडीला सुरवात झाली. दापोलीत पारा 11.09 अंशापर्यंत घसरला होता. त्यावेळी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस होते. त्यानंतर अचानक पारा वर चढू लागला. किमान तापमान 23 अंश असून कमाल तापमान 36 अंश आहे. सकाळी 11 वाजल्यापासून उन्हाचा कडाका सहन न करण्याएवढा जाणवत आहे. उशिरापर्यंतच्या पावसामुळे 80 टक्के कलमांवर पालवी आली आहे. ती जून होईपर्यंत एक महिन्याचा कालावधी लागेल. पुढे मोहोर येईपर्यंत पंधरा दिवस लागतील. त्या कालावधीत थंडी पडली नाही तर मोहोर येण्यास उशिर होईल अशी शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडीचा कडाका जाणवला नाही, तर बागायतदार अडचणीत येणार आहे. आंबा एकाचवेळी बाजारात आला तर त्याचा दरावर परिणाम होतो. सध्या कडकडीत उन्ह असून अधुनमधून ढगाळ वातावरण आहे. उन्हामुळे पालवी जुन होईल. त्यातून मोहोर येण्यास उशिर होणार हे निश्‍चित आहे.