सावधान! पुन्हा कोरोनाचा धोका; एमआयडीसी पाठोपाठ रत्नागिरीत सापडले सहा रुग्ण

रत्नागिरी:- दिवाळीनंतर रत्नागिरीत कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. गुरुवारी एमआयडीसीतील एकाच कंपनीत दहा रुग्ण सापडल्यानंतर सायंकाळी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाच दिवसात सोळा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून दिवाळीत खरेदीसाठी झालेली गर्दी याला कारणीभूत असल्याचा अंदाज आहे.
 

गणपतीनंतर रत्नागिरीतील कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र होते. नोव्हेंबर महिन्यात तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण सापडत असल्याने आरोग्य विभाग आणि प्रशासनाने मोकळा श्वास घेतला. मात्र दिवाळीत खरेदीसाठी झालेली गर्दी कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. 
 

गुरुवारी रत्नागिरी एमआयडीसी मधील एकाच कंपनीत 10 रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ आरटीपीसीआर चाचणी केलेल्या सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कुवारबाव मधील 2 रुग्णांचा समावेश आहे. यासह टीआरपी येथील 2, टेम्बे येथील 1 आणि खेडशीतील एका रुग्णाचा समावेश आहे. वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.