पंचवीस लाखांची लॉटरी लागल्याच्या नावाखाली पाच लाखाची फसवणूक 

रत्नागिरी:- केबीसीमधून 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत गवळीवाडा येथील एकाची तब्बल 5 लाख 299 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे भरल्यानंतरदेखील लॉटरीची रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

या विरोधात कैसेरबानू इब्राहिम काझी (43, रा. गवळीवाडा रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. काझी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश वर्मा, अनिल कुमार यादव आणि नंदकिशोर पासवान या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

11 नोव्हेंबर रोजी काझी यांना व्हाट्सअँपवर मेसेज आला. केबीसीमधून तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. मेसेजसोबत एक व्हिडिओ देखील काझी यांच्या मोबाईल व्हाट्स अँप वर आला. यानंतर आरोपी याने काझी यांना बँक मॅनेजर सोबत बोलून घ्या असे सांगितले. आरोपी याने दिलेल्या मोबाईवर काझी यांनी फोन केला. फोनवर बोलणाऱ्या तोतया बँक मॅनेजरने तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितल्याने काझी यांचा विश्वास बसला. 
 

यानंतर आरोपी याने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकारून काझी यांना फोन करून पैसे ट्रान्सफर करायचे चार्जेस, करन्सी बाहेर देशातील आहे त्याचे कन्व्हर्ट चार्जेस, जीएसटी चार्जेस, सीबीआय तपासणी चार्जेस अशी कारणे सांगून काझी यांच्याकडून 5 लाख 299 रुपये उकळले. पैसे भरल्यानंतर देखील लॉटरीची रक्कम न मिळाल्याने आणि आरोपी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने काझी यांनी शहर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.