आरोग्य केंद्रात पुन्हा योगाचे वर्ग

रत्नागिरी:- ग्रामीण भागात असलेली आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे आरोग्य वर्धिनीत रुपांतरीत केली. या अंतर्गत उपचारात आयुर्वेदिक औषधांचाही वापर सुरु झाला आहे. कोरोना पुर्वी नुकतेच सुरु झालेले योगा शिक्षण गेल्या सात महिन्यात बंद होते. सध्या प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे आरोग्य केंद्रात आठवड्यातून एक दिवस योगाचे वर्ग घेतले जाणार आहेत.

केंद्र व राज्य शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधांयुक्त करण्यासाठी आरोग्य वर्धिनी योजना हाती घेतली होती. त्यामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्रात बीएएमएस डॉक्टर्स्ची नियुक्ती करतानाच आयुर्वेदिक उपचाराशी निगडीत औषधोपचारही सुरु केला होता. आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण, ग्रामस्थ, कर्मचारी यांचे स्वास्थ चांगले रहावे यासाठी योगा प्रशिक्षण देण्याचा निर्णय आरोग्य वर्धिनीअंतर्गत घेण्यात आला होता. त्यानुसार योगा शिक्षकांची नियुक्तीही केली होती. जिल्ह्यात 67 प्राथमिक आरोग्य केद्र असून 31 प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकाकडे दोन आरोग्य केंद्रांच्या जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये याचा आरंभ झाला होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळत होता. मार्च महिन्यात कोरोनाने हात पाय पसरण्यास सुरवात केल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी योगा शिक्षण बंद करण्यात आले. गेले सात महिने जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव होता. तो ओसरु लागला असल्याने जनजीवन पुर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे योगा शिक्षण पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. आठवड्यातून एक दिवस आणि महिन्यातून चारवेळा योगा वर्ग घ्याव्यात अशा सुचना दिलेल्या आहेत. कोरोना कालावधीत शरीर स्वास्थ राखण्यासाठी योगाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले होते. शहरी भागात गेल्या सात महिन्यात घराघरात योगासने सुरु होती. काहींनी तर सोशल डिस्टन्सिंग ठेवत टेरेसवरही योगा करण्यास सुरुवात केली होती.