यशोधन अपार्टमेंटमधील बच्चेकंपनीने साकारली राजगडाची प्रतिकृती

रत्नागिरी:- सर्वत्र दिवाळीचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत आहे. फटाके आणि फराळासोबत बच्चे कंपनी किल्ले बनवण्यात गुंतली आहे. रत्नागिरी शहरातील यशोधन अपार्टमेंट बच्चे कंपनीने किल्ले राजगडाची प्रतिकृती साकारली आहे. अतिशय मेहनत घेऊन हुबेहूब राजगडाची दिसणारी प्रतिकृती दिवाळी सणात आकर्षणाचा विषय ठरली आहे.
 

दिवाळी सणात फटाके, फराळासोबत बच्चे कंपनीला आनंद असतो तो किल्ले बनवण्याचा. लाल मातीत खेळणार हात आणि त्यातून घडणारे किल्ले दिवाळीत आकर्षणाचा विषय असतो. शहरातील अभ्युदय नगर येथील यशोधन अपार्टमेंट मधील बच्चे कंपनीने यावेळी किल्ले राजगड उभा केला आहे.
 

शहरात राहूनदेखील इथल्या लहानग्यांनी सणाचे महत्व जपत किल्ला तयार केला आहे. आवारातील जागेची उपलब्धता पाहून किल्ला साकारण्यात आला आहे. यासाठी अनुप कातळकर, श्रेयस काटकर, निल नलावडे, कुणाल चव्हाण, सिमरन बामणे यांच्यासह अपार्टमेंट मधील 10 ते 12 मुलांनी मेहनत घेतली आहे.