दिवाळी, लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे

रत्नागिरी:- नरक चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात दिवाळी आणि लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. दीपावलीच्या दिवशीच लक्ष्मीपूजन असल्याने जिल्हाभरात उत्साह होता. शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये व्यापाऱ्यांनी नव्या चोपड्यांची पूजा करत लक्ष्मीपूजन केले. सायंकाळी सहा वाजल्यापासुन फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपुजन करण्यात आले.  

शनिवारी नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंगस्नानाने दिवाळी सणाला सुरूवात झाली. यावर्षी दिवाळीचे अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने जिल्हाभरात उत्साह होता. शनिवारी पहाटे सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी झाली. पहाटे फटाके फोडून सर्वांनी आनंद साजरा केला. यानंतर दिवाळीच्या चमचमीत फरळावरही सर्वांनी ताव मारला.  

एकाच दिवशी आलेल्या दिवाळी आणि लक्ष्मीपुजनासाठी व्यापारी वर्गाने जोरदार तयारी केली होती. लक्ष्मीपूजनाकरीताही बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. पुजेसाठी आवश्यक वस्तुची तेवढीच खरेदी यावेळी झाली. लक्ष्मीपूजन असल्याने सायंकाळनंतर मात्र शहरातील रस्ते ओस पडले होते. व्यापाऱ्यांनी लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले. भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मी ही समृद्धीची, संपदेची देवता मानली जात असल्याने, दारिद्रय दूर होण्यासाठी व धनाची वृद्धी होण्यासाठी लक्ष्मी पूजन करावे असे धर्मग्रंथात सांगितले जाते. लक्ष्मीपूजन निमित्त शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी जमाखर्चाच्या वह्यांची पूजा करून नवीन खाती सुरू केली. सर्व सामानसुमान व्यवस्थित ठेवत, झाडलोट करत व्यापाऱ्यांनी लक्ष्मीचे पूजन केले. यावेळी मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.  

सोमवारी पाडवा सण साजरा करण्यात येणार आहे. दिवाळी पाडवा या सणादिवशी बाजारात ज्वेलर्स आणि इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. पाडव्याला सोने आणि मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची प्रथा असल्याने सोमवारी बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारीच भाऊबीज साजरी होणार आहे. यामुळे पुढील दोन दिवस बाजारा मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.