एसटी महामंडळाच्या संचित तोट्यात वाढ: ॲड. परब 

रत्नागिरी:- एसटी महामंडळ संचित तोटा वाढला आहे. महामंडळ आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना करुन एसटीचा आर्थिक स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न या पुढील काळात केला जाणार असून खाजगी गाड्यांची बॉडी बांधणी, पेट्रोल पंप सर्व सामान्यांना खुले, टायर रिमोल्ट यासह सरकारी वाहतूक यापुढे एसटीच्या मालवाहू ट्रकातून सक्तीने केली जाणार आहे. येत्या काही काळात एसटी महामंडळ आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार असून खाजगीकरणाचा विचार राज्य सरकारने कधीहि केलेला नव्हता, यापुढे करणार नाही अशी ग्वाही परिवहन मंत्री ना.ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवारी आढावा बैठकीसाठी ना.ॲड.अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत रत्नागिरीत आले होते. आढावा बैठकीनंतर त्यांनी हि माहिती दिली. एसटी आर्थिक संकटात आहे ही वस्तुस्थिती आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटीच्या संचित तोट्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. प्रमुख आर्थिक स्त्रोत असलेली वहातूक सेवा बंद झाल्याने त्याचा मोठा परिणाम महामंडळावर झाला. कर्मचार्यांना पगार देता आले नाहीत. परंतु यापुढे केवळ प्रवासी वाहतूकीवर अवलंबून न राहता महामंडळाने आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा निर्णय महामंडाळाने घेतल्याचे ना.परब यांनी सांगितले.

राज्यातल्या सर्व मार्गावर रिकामी फिरणाऱ्या गाड्यांमुळे तोट्यात भर पडत आहे. यासाठी फेर्यांचे फेरनियोजन करण्याच्या सुचना राज्यातील सर्व विभागाना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी, वयोवृध्द यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन अधिकार्‍यांनी फेऱ्यांचे नियोजन करावे. इंधनातून पैशाची बचत करण्यासाठी डिझेल ऐवजी कमी दरातील पर्यायी इंधन वापरण्याबाबत चाचपणी सुरु आहे. यापुढे नव्याने खरेदी होणाऱ्या वाहनांसाठी सीएनजीचा पर्याय ठेवण्यात आला असल्याचे ना.परब म्हणाले.

राज्यात एसटी महामंडळाचे ६०० डेपो आहेत. आतापर्यंत केवळ एसटीच्या गाड्यांना यातून डिझेल वितरीत करण्यात येत होते. परंतु यापुढे या पेट्रोल पंपाचा वापर व्यावसायिक दृष्ट्या करण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन पंपाचा समावेश आहे. भविष्यात या जिल्ह्यातील पेट्रोल पंपाची संख्या वाढविण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागातील माल, साहित्याची वाहतूक खाजगी वाहनांद्वारे केली जाते. या सर्व वाहतूकीचे काम एसटी च्या मालवाहतू ट्रकना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे ना.परब यांनी सांगितले.

रत्नागिरी वाहक, चालक पांडुरंग गडदे यांच्या मृत्यूचे राजकारण करण्यात आले आहे. गडदे यांचा मृत्यू आर्थिक संकटामुळे झालेला नाही. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा खून झाल्याची शक्यता व्यक्ती केली असून तशी लेखी तक्रार शहर पोलीस स्थानकात केली आहे. पांडुरंग गडदे यांचा खून की आत्महत्या हे अद्याप निश्चित झालेले नसताना विरोधक मृत्यूचे करत असलेले राजकारण दुदैवी असल्याचे ना.परब यांनी सांगितले.