कोविड नियंत्रणासाठी आणखी 30 लाखांच्या निधीची मागणी

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयाला कोविडसाठी प्राप्त झालेला निधी 100 टक्के खर्ची पडला आहे. आतापर्यंत 2 कोटी 71 लाख प्राप्त झाले होते, ते सर्व खर्च झाले. मात्र अजून निधी कमी पडत असल्याने वाढीव 30 लाखांची मागणी  शासकीय रूग्णालयाकडून आरोग्य उपसंचालकांकडे करण्यात आली आहे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी माहिती दिली.

कोविड काळात जिल्हा शासकीय रूग्णालयाने उत्तम कामगिरी बजावतानाच कोरोनाबाबत जनजागृती कार्यकम, उपकमही घेतले. कोरोना काळात वाढीव वॉर्डवॉय भरती केले. खाजगी वैद्यकीय अधिकार्‍यांनाची टीम तयार करण्यात आली. यावेळी निधी अभावी वैद्यकीय सेवेत कोणतीही अडचणी येवू नयेत, यासाठी आरोग्य विभागाकडून जिल्हा शासकीय रूग्णालयाला 2 कोटी 71 लाख निधी प्राप्त झाला होता. यापैकी 37 लाख 63 हजार रूपये ग्रामीण रूग्णालयांना वर्ग करण्यात आले. हा निधी देखील खर्ची पडले आहे. एकूण 92 लाख 81 हजार निधी हा कोरोना सोयी सुविधांसाठी खर्च झाला. उर्वरीत 1 कोटी 78 लाख 19 हजार रूपये हा निधी औषधे, साहित्य, वॉर्डबॉय पगार आदींसाठी खर्ची पडला असल्याची माहिती डॉ. फुले यांना दिली.

कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलिस आदी यंत्रणांना यश आले आहे. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्केच्या वर गेले आहे. मात्र दुसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने खबरदारी घेतली आहे. विविध सोयीसुविधांसाठी अजून 30 लाखांची गरज असून तशी मागणी शासकीय रूग्णालयाकडून आरोग्य उपसंचालकांकडे करण्यात आली आहे.